एटीएम न्यूज नेटवर्क ः अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी) मधील उत्पादनविषयक माहितीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे. वर्ष 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24% चे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
वर्ष 2014-15 ते 2021-22 अशा गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात 51% ची वाढ नोंदवण्यात आली असून, वर्ष 2021-22 मध्ये देशातील दूध उत्पादन बावीस कोटी टनांपर्यंत वाढले आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
देशात राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यात सर्वाधिक दूध उत्पादन होते. उत्तर प्रदेश प्रथम, राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या स्थानी मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश या राज्यांचा दूध उत्पादन करण्यात क्रमांक लागतो. याबाबतची माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने यापूर्वी दिली होती.
सहकारातून दुग्ध व्यवसाय करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हा व्यवसाय गरीब देशांसाठी उद्योगांचे एक आदर्श उदाहरण ठरू शकेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते. भारताच्या दुग्ध विकासात महिलांचे प्रतिनिधित्व 70 टक्के आहे. त्यामुळे या क्षेत्राचे खरे नेतृत्व महिलाच करत आहेत. असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते.