एटीएम न्यूज नेटवर्क ः जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश म्हणून भारताला ओळख मिळाली आहे. भरघोस उत्पादनामुळे भारत नेहमीच साखर निर्यात करणारा प्रमुख देश ठरला आहे. परंतु एल निनो या हवामानाच्या घटकामुळे यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस लांबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेती उत्पादनांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.
एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन उत्पादन घटण्याची भीती असल्यामुळे पुढील हंगामाच्या किमान पहिल्या सहामाहीपर्यंत केंद्र सरकार साखर निर्यातीस परवानगी देण्याचा विचार करत नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. या आशयाचे वृत्त इकोनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.
कोणत्याही साखर हंगामात उत्पादनाविषयी स्पष्ट कल्पना येण्यासाठी किमान काही महिने लागतात. त्यामुळेच उत्पादनाबाबत पूर्णपणे स्पष्ट चित्र येईपर्यंत आम्ही वाट पाहत आहोत, असे आणखी एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
हवामान हा एक मोठा नकारात्मक घटक असून, गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही साखरेचे उत्पादन घटले. यंदा एल निनोमुळे निर्यातीला लवकर परवानगी देण्याचा धोका पत्करू शकत नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
एक ऑक्टोबरपासून नवीन विपणन वर्ष सुरू होण्यापूर्वी साखरनिर्यात किती प्रमाणात होऊ शकते हे साखर कारखाने ठरवतात. भारतातून निर्यातीसाठी विलंब झाल्यास जागतिक साखरेच्या किमती उच्चांकी राहू शकतात.
2023-2024 हंगामात भारताने नंतर निर्यातीस परवानगी देण्याचे मान्य केले असले तरी, केंद्र सरकार कदाचित 4 दशलक्ष टनांपेक्षा जास्त निर्यातीस परवानगी देणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 2023 मध्ये काही राज्यांच्या निवडणुका आणि 2024 च्या मध्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी अन्नधान्याच्या किमतींवर सरकारकडून नियंत्रण ठेवले जाणार आहे.
चालू साखर हंगामाच्या सुरुवातीस 30 सप्टेंबर 2023 पर्यंत साखर उद्योगाने यावर्षीच्या उत्पादनाचे लक्ष्य 36 दशलक्ष टन इतके ठेवले होते. आता ते कमी करून 32.8 दशलक्ष टन करण्यात आले आहे. कमी उत्पादनामुळे भारताने या हंगामात 6.1 दशलक्ष टन निर्यातीला परवानगी दिली. कोटा संपल्याने भारत सध्या साखर निर्यात करत नाही.