एटीएम न्यूज नेटवर्क : एल निनो या हवामान बदलाशी निगडित घटकामुळे नैर्ऋत्य मोसमी पाऊस लांबणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा इशारा जवळपास खरा ठरत आहे. जून महिना संपत आला तरी राज्यात पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पुरेसा पाऊस होईपर्यंत खरीप पेरणीसाठी घाई करू नका, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे, अशा आशयाचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.
आत्तापर्यंत राज्यात जूनमध्ये केवळ 11% पाऊस पडला आहे. खरिप हंगामात फक्त 1% पेरणी झाली आहे. या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने नुकतीच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उच्च अधिकार्यांसोबत एक बैठक घेतली. मॉन्सून लांबल्याच्या पार्श्वभूमीवर आकस्मिक उपायांवर चर्चा केली.
हवामान बदलामुळे मॉन्सूनच्या सामान्य आगमनाला उशीर झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते महाराष्ट्रात मॉन्सूनचे सुधारित अंदाजे आगमन 24-25 जूनच्या आसपास आहे, असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटले आहे.
दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 80-100 मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणीची कामे सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा 20% जास्त बियाणे वापरण्यास आणि उत्पादनातील लक्षणीय घट कमी करण्यासाठी कमी कालावधीच्या पीक वाणांची निवड करण्यास प्रोत्साहित केले आहे. शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक घेण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.