एटीएम न्यूज नेटवर्क ः वनस्पती आधारित खाद्यपदार्थ काळाच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच रोजगार निर्माण करणार असून, त्यामुळे कृषी क्षेत्रालाही बळ मिळेल. शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेता वनस्पती आधारित पर्यायी आहार हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असा विश्वास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला.
भविष्यातील अन्न सुरक्षेचा पर्याय म्हणून वनस्पती आधारित खाद्यपदार्थांवर विचारमंथन करण्यासाठी नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे आयोजित 'आहार' प्रदर्शनादरम्यान 'डॉन ऑफ अ प्लांट-बेस्ड एज' या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्लांट बेस्ड फूड्स इंडस्ट्री असोसिएशन (पीबीएफआयए) तर्फे झालेल्या या परिषदेचे उद्घाटन श्री. तोमर यांच्या हस्ते झाले.
श्री. तोमर म्हणाले, की भविष्यात आवश्यक असलेले पर्याय आपण तयार केले, तर आगामी काळात येणारे कोणतेही संकट आपण टाळू शकतो. आम्हाला वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांची चांगली जाणीव आहे. अन्न सुरक्षा हे त्यापैकी एक आहे. येत्या काही दशकात भारत स्वातंत्र्याची शताब्दी पूर्ण करेल,तोपर्यंत लोकसंख्याही वाढेल. यादरम्यान भारतातील लागवडीखालील क्षेत्रामध्ये संभाव्य घट होण्याची शक्यता लक्षात घेता आपल्याला तयार राहावे लागेल.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार राज्य सरकारांसह 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यात झपाट्याने गुंतले आहे. ते कसे होईल याचा आतापासूनच विचार करण्याची गरज आहे.
तोमर म्हणाले, की नागरिकांची शेतीबद्दलची आवड सतत वाढली पाहिजे, ही आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळेच कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक आली पाहिजे, नवीन तंत्र आले पाहिजे, काम सोपे झाले पाहिजे. शेतकऱ्यांना अधिक नफा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदी नेहमीच आग्रही असतात. पीबीएफआयए पदाधिकारी संजय सेठी, अपेडाचे सचिव डॉ. सुधांशू आणि आयटीपीओचे रजत अग्रवाल हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
(स्रोत ः अपेडा)