एटीएम न्यूज नेटवर्क ः महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने आपल्या मांजरी फार्म प्रयोगशाळेच्या प्रक्षेत्रात नवे द्राक्ष वाण विकसित केले आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून या वाणाच्या संशोधनाचे काम सुरू होते. चालू हंगामात सदर द्राक्ष वाणाचा प्लॉट काढणीला आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन उत्कृष्ट रंग, उत्कृष्ट चव, चांगली वजनदार आणि सुवासिक द्राक्ष प्रजाती विकसित करण्यात द्राक्ष बागाईतदार संघास यश आले आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागात, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरण परिस्थितीत या वाणाची चाचणी व्हावी, या उद्देशाने मांजरी फार्म येथील प्रयोगशाळेसोबतच बागाईतदार संघाच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी या वाणाची काही रोपे देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष भारत शिंदे, उरुळी कांचन येथील अभिषेक कांचन आणि नाशिक येथील अशोक गायकवाड यांना चाचणी आणि अभ्यासासाठी नव्या वाणाची काही रोपे देण्यात आली होती. त्या सर्व प्लॉट्सवर या वाणाबाबत समाधानकारक अभिप्राय प्राप्त झाले आहेत. या चाचणीदरम्यान प्राप्त झालेल्या अभिप्राय आणि सूचनांचा अभ्यास करून या वाणात आणखी काही सुधारणांची शक्यता तपासली जाणार आहे.
देशात द्राक्ष निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा एकछत्री अंमल असून, आकर्षक रंग आणि मधुर चवीच्या द्राक्षांना युरोप, चीन, मध्य-पूर्व आशियासह जगभरात मोठी मागणी असते. भारतातील एकूण द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ९८% इतका असून, महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनांपैकी फक्त ८% माल निर्यात होतो. सुधारित वाणांच्या वापराने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भरघोस वाढ होईल, असा विश्वास महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघ सातत्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी नवनवीन संशोधनांना पाठबळ देत असून, अधिकाधिक सक्षम, निरोगी आणि उत्पादनक्षम द्राक्ष वाणांच्या विकासनासाठी जागरूकपणे कार्य करत आहे. आता नव्याने विकसित करण्यात आलेले वाण हे सध्याच्या क्रीमसन जातीपेक्षाही सुधारित असून, आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक बाजारपेठेतदेखील भाव खाऊन जाणार, असा आम्हाला विश्वास आहे. मांजरी फार्म प्रयोगशाळेसोबतच तळेगाव वणी (जि. नाशिक) येथील प्रक्षेत्रावर सुमारे एक हजार झाडांचा प्लॉट उभारण्यात आला आहे. पुढील हंगामात सदर प्लॉटवर फळधारणा होणे अपेक्षित आहे.
- शिवाजीराव पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, पुणे
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीनुसार चांगल्या रंग, चव, वजनाची आणि सुवासिक द्राक्ष प्रजाती द्राक्ष बागाईतदार संघाने विकसित केली आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनाला यश प्राप्त झाले आहे. या प्रजातीचे नामकरण करून लवकरच द्राक्ष बागाईतदारांना उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात मोठी वाढ होणार असून त्यातून द्राक्ष बागाईतदारांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे.
- चंद्रकांत लांडगे, अध्यक्ष, मध्यवर्ती विज्ञान समिती, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ
गेल्या चार वर्षांपासून सदर द्राक्ष प्रजातीची काही रोपे आमच्या प्लॉटवर चाचणीसाठी आणली होती. या प्रजातीच्या झाडांची पूर्ण वाढ झाल्यावर फळधारणा झाली. या प्रजातीची जनुकीय चाचणी केली असता ती 'क्रीमसन' प्रजातीशी काही अंशी साधर्म्य साधणारी आहे. द्राक्षांचा आकार, वजन आणि रंग इतर प्रजातींपेक्षा सरस असून फळ अधिक मधुर आणि सुवासिक (अरोमॅटिक) आहे. द्राक्षाचे आवरण मजबूत असून अवकाळी पावसाचा मारा सहजपणे सहन करू शकते. सदर झाडांना वाढीसाठी आवश्यक हार्मोन्सची गरज अत्यंत मर्यादित असून महाराष्ट्राच्या सर्व भागांत या वाणाचे उत्पादन घेता येईल.
- अभिषेक कांचन, प्रयोगशील शेतकरी, उरुळी कांचन, पुणे तथा संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ