एटीएम न्यूज नेटवर्क : दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने फिलीपाइन्सच्या आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेशी (ईरी) भाताच्या संशोधनासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि फिलीपाइन्सचे आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महानिर्देशक डॉ.अजय कोहली यांनी फिलीपाइन्स येथे सामंजस्य करार केला.
कोकण कृषी विद्यापीठाने भातामध्ये भरीव संशोधन करून आतापर्यंत ३५ वेगवेगळ्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. महाराष्ट्रातील पहिली संकरित जात तयार करण्याचा बहुमान या विद्यापीठाला प्राप्त झाला आहे.
या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, भाताच्या विविध स्थानिक वाणांचे संकलन, वैशिष्ट्य सुधारणा त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती, ताण सहन करणाऱ्या जाती तसेच विविध किडी व रोगांना बळी पडणाऱ्या जातींवर संशोधन करण्यात येणार आहे.शैक्षणिक आणि संशोधनासाठी बाह्यस्रोताची उपलब्धता या संदर्भात विविध प्रकल्प राबविणे हे कार्य होणार आहे.