एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतातील अग्रगण्य कृषी ड्रोन उत्पादक कंपनी आयओ टेकवर्ल्ड एव्हिगेशन आणि कृषी रसायन क्षेत्रातील प्रमुख सिन्जेंटा इंडिया यांनी संयुक्तपणे एक टिकाऊ 'दास' (DaaS) व्यवसाय मॉडेल विकसित केले आहे. पुढील खरीप आणि रब्बी हंगामात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा या चार प्रमुख राज्यांमध्ये व्यावसायिक फवारणी सेवा सुरू करणार आहेत.
आयओ टेकवर्ल्ड एव्हिगेशन आणि सिन्जेंटाने यापूर्वीच 13 राज्यांमध्ये ड्रोन यात्रा आयोजित केली असून, 17,000 किमीच्या यात्रेत 1 लाखांहून अधिक शेतकर्यांना कृषी ड्रोनचे फायदे दाखवून दिले आहेत.
पंजाबमधील लुधियाना येथे प्रत्यक्ष कृषी रसायनांचा वापर करून एक संयुक्त पथदर्शी उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये शेतकरी आणि कृषी उद्योजकांना कृषी रसायनांच्या फवारणीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरण्याच्या फायद्यांविषयी माहिती देण्यात आली आहे.
योजनेबद्दल तपशील देताना आयओ टेकवर्ल्ड एव्हिगेशनचे सहसंस्थापक दीपक भारद्वाज आणि अनुप उपाध्याय म्हणाले, आम्ही संपूर्ण भारतात ड्रोन फवारणीसाठी सिन्जेंटा इंडियासोबत हातमिळवणी केली आहे. आम्ही पंजाबमध्ये पथदर्शी उपक्रम राबविला असून, त्याला खूप उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. पुढची पायरी म्हणून दोन्ही कंपन्या संयुक्तपणे आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये काम करण्याची योजना आखत आहेत. ड्रोन वापरून फवारणीचे फायदे शेतकरी आणि इतर भागधारकांना अधोरेखित करणे हा यामागील विचार आहे.
व्यावसायिक मॉडेलवर माहिती देताना आयओ टेकवर्ल्ड एव्हिगेशनचे विक्री महाव्यवस्थापक सौरभ श्रीवास्तव आणि सिन्जेंटा इंडियाच्या कामकाजाचे प्रमुख महांतेश चुलकी म्हणाले, की या शाश्वत समुहावर आधारित 'दास' व्यावसायिक मॉडेलची कल्पना अनेक कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि नागरिकांना आवडली आहे. अगदी एसबीआयसारख्या वित्तीय संस्थादेखील केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी पायाभूत वित्तपुरवठा सुविधा योजनेद्वारे 2 कोटी रुपयांपर्यंत भांडवली कर्ज देत आहेत. त्यांनादेखील कर्ज वाटप करण्यात खूप आत्मविश्वास आहे.
आयओ टेकवर्ल्ड एव्हिगेशन आणि सिन्जेंटाद्वारे विकसित केलेल्या दास मॉडेलसाठी भारतीय स्टेट बँकेने हरियाणा, महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधील ड्रोन सेवा प्रदात्यांना राष्ट्रीय कृषी पायाभूत वित्तपुरवठा सुविधा योजनेअंतर्गत आधीच कर्ज वितरित केले आहे.
सिंजेंटा इंडिया आणि आयओ टेकवर्ल्ड एव्हिगेशन या दोन्ही कंपन्यांनी नुकतीच देशभर ड्रोन फवारणी सेवा सुरू करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या करारांतर्गत दोन्ही भागीदार आयओ टेकवर्ल्ड एव्हिगेशनच्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सिन्जेंटाने मंजूर केलेल्या रसायनांच्या फवारणीला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे काम करतील. याशिवाय दोन्ही कंपन्या ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यासाठी तयार करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम करणार आहेत.
(स्रोत ः अॅग्रोपेजेस डॉट कॉम)