एटीएम न्यूज नेटवर्क ः इफको नॅनो डीएपी (द्रव्य) चे अनावरण ही खतांच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाची सुरुवात आहे. इंडियन फार्मर फर्टिलायझर कोओपरेटिव्ह लिमिटेड (इफको)चा हा प्रयत्न सर्व राष्ट्रीय सहकारी संस्थांना नवीन क्षेत्रात संशोधन आणि उपक्रम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.
इफको नॅनो डीएपीमुळे भारताच्या कृषी क्षेत्रात एक आदर्श बदल घडून येईल, यामुळे शेतकरी समृद्ध होईल आणि भारत उत्पादन आणि खतांच्या क्षेत्रात स्वावलंबी होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.
अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे इंडियन इफको नॅनो डीएपी (द्रव्य) चे अनावरण केले. सहकार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश कुमार आणि इफ्कोचे अध्यक्ष दिलीप संघानी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अमित शाह म्हणाले की, द्रव्य डीएपीचा वापर झाडावर फवारणीद्वारे केल्याने उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढण्यास तसेच जमिनीचे संवर्धन होण्यास मदत होईल. यामुळे जमिनीची सुपिकता पुनर्संचयित करण्यात मोठा हातभार लागेल. रासायनिक खतांमुळे कोट्यवधी भारतीयांच्या आरोग्याला असलेला धोका कमी होईल.
शेतकऱ्यांना दाणेदार युरिया आणि डीएपीऐवजी अधिक प्रभावी द्रव्य नॅनो युरिया आणि डीएपी वापरण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, दाणेदार युरियाच्या वापरामुळे जमिनीचे तसेच पीक आणि लोकांच्या आरोग्याचे नुकसान होते. कोणताही नवीन बदल स्वीकारण्याची शेतकऱ्यांची कमाल क्षमता आहे. 500 मिलीच्या एका बाटलीचा पिकावर होणारा परिणाम 45 किलो ग्रॅन्युलर युरियाच्या पिशवीइतकाच असतो.
देशात 384 लाख मेट्रिक टन खताचे उत्पादन होते, त्यापैकी सहकारी संस्थांनी 132 लाख मेट्रिक टन खताचे उत्पादन केले. या 132 लाख मेट्रिक टन खतांपैकी इफकोने 90 लाख मेट्रिक टन खताचे उत्पादन केले आहे.