एटीएम न्यूज नेटवर्क : द्राक्षबागांसाठी सर्वसमावेशक असा दृष्टीकोन बाळगतांना संशोधन, निर्यातवाढीच्या क्षेत्रात आमचे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी आणि त्यांना चांगला परतावा मिळावा यासाठी कंपनी नेहमीच प्रयत्न करत असते असे यारा इंडियाचे भान सिंग यांनी सांगितले. ते द्राक्ष उत्पादकांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यारा इंडिया, नाशिक टीमच्या वतीने 'ग्रेप गुड हार्वेस्ट मीट' या उपक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते.
सह्याद्री फार्म्सचे संचालक मंगेश भास्कर यांनी बदलत्या वातावरणानुसार निर्यातक्षम बाजारपेठेसाठी द्राक्षामधील नवीन वाण याबाबत सखोल माहिती दिली. दाभोळकर प्रयोग परिवारचे मुख्य समन्वयक व प्रगतशील शेतकरी वासुदेव काठे यांनी द्राक्ष पिकांमधील प्रमुख समस्या व उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.
वरिष्ठ द्राक्ष सल्लागार विश्वेश कराडे यांनी 'अन्नद्रव्ये व्यवस्थापन हे पर्याय नाही तर गरज आहे' याविषयी संवाद साधला. तर यारा रेगा, यारा विटा व यांसारख्या उत्पादनांविषयीची तसेच द्राक्ष पिकासाठी विद्राव्य खतांची नवी श्रेणी याविषयीची माहिती यारा इंडियाचे फर्टीगेशन मॅनेजर रविंद्र घडवजे यांनी दिली. आभार केशव बरकले यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी २२० पेक्षा जास्त द्राक्ष उत्पादकांनी उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यासोबतच २०२३ मध्ये भरीव कामगिरी केलेल्या द्राक्ष उत्पादकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात होते.
२०२३ च्या द्राक्ष हंगामात भरीव कामगिरी करतांना भरघोस उत्पादन मिळविलेल्या २५ प्रगतशील शेतकऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सागर पाचोरकर, उमेश नवले, ऋषिकेश धोंडगे, शिवाजी फडोळ, रामचंद्र चुंभळे, स्वप्निल निफाडे, किशोर गायधनी, हेमंत सरोदे, तुषार पाचोरकर, गोरख काळे, बापू निफाडे, भास्कर गवळे या प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश होता.