एटीएम न्यूज नेटवर्क : छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत (एंड-
टू-एंड) सहाय्य प्रदान करणारे सह्याद्री फार्म्स हे ग्रामीण उद्योजकतेचे उत्तम उदाहरण आहे. सन २०१०
मध्ये दहा शेतकऱ्यांच्या छोट्या गटाने एकत्र येत द्राक्षे युरोपात निर्यात केली. हाच छोट्या शेतकऱ्यांचा
समूह आज सह्याद्री फार्म्सच्या रूपाने भारतातील आघाडीची फळे आणि भाजीपाला निर्यात आणि
प्रक्रिया करणारी कंपनी बनली आहे. नऊ पिके, १८ हजार शेतकरी आणि ३१ हजार एकरहून अधिक
क्षेत्रावर सह्याद्री फार्म्सचा विस्तार झाला आहे. सह्याद्री पोस्ट केअऱ लि. या कंपनीमध्ये नुकतेच
युरोपातील गुंतवणूकदारांच्या समूहाने ३१० रुपये कोटींची थेट परकीय गुंतवणूक केली आहे. या
यशाच्या निमित्ताने सह्याद्री फार्मसचे संस्थापक (शेतकरी) आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे
यांच्याशी अॅग्री ट्रे़ड मीडियाने संवाद साधला. कृषीमाल निर्यात आणि प्रक्रिया उद्योगातील संधी आणि
आव्हानांविषयी त्यांनी मुक्त विवेचन केले.
१. नाशिक जिल्हा भारताचे कृषी हब बनू शकते का?
उत्तर : नाशिक जिल्हा हा नक्कीच भारताचे कृषी हब बनू शकतो. या जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू
आहे. प्रयोगशील आणि विज्ञानवादी आहे. त्याचेच प्रतिबिंब इथल्या कृषि अर्थव्यवस्थेत उमटलेले दिसत
आहे. जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेत द्राक्ष पिकांत सर्वाधिक ७००० कोंटीची उलाढाल होते. दीड लाख एकर
क्षेत्र या पिकाखालील आहे. कांदा या पिकासाठी नाशिक जिल्हा देशातच नव्हे, तर जगात ओळखला
जातो. या कांद्यामधूनही जवळपास पाच हजार कोटींची उलाढाल होते. त्या खालोखाल टोमॅटो हे
महत्वाचे पिक. सप्टेंबर ते डिसेंबर या काळात संपूर्ण देशाला टोमॅटो पुरवण्याचे काम नाशिक जिल्हा
करतो. या पिकातही पाच हजार कोटींची उलाढाल होते. डाळिंब ही मोठी उलाढाल असलेले पिक
नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिकमध्ये फलोत्पादनाची चळवळ ज्या पद्धतीने वाढत गेली, तिने
महाराष्ट्रालाही दिशा देण्याचे काम केले आहे.
ऊस आणि कापूस यांच्याशिवाय इतर पिकांतूनही ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकते.
विशेषत: कमी पाण्यातून, कमी क्षेत्रातून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकते. हे फळपिकांच्या
निमित्ताने नाशिक जिल्ह्याने सबंध राज्याला आणि देशालाही दाखवून दिले आहे. त्यातूनच अन्नधान्य
पिकांपेक्षाही फलोत्पादनातील पिकांचे उत्पादन वाढले आहे. त्यातून राज्यातील व देशातील ग्रामीण
भागाला दिशा मिळाली आहे असे म्हणायला हरकत नाही. येथून पुढील राज्याच्या आणि देशाच्या
कृषिक्षेत्राची वाटचाल लक्षात घेता त्यात नाशिक जिल्ह्यातील शेतीचे प्रयोग महत्त्वाचे ठरतील यात
शंकाच नाही. येणाऱ्या काळातही नाशिक जिल्हा महत्त्वाची कामगिरी बजावेल. ग्रामीण भागात फक्त
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणे एवढाच विषय नाही, तर त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही
तयार होणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने राज्यातील कृषी औद्योगिक वाटचालीत नाशिक
जिल्ह्याचे पाऊल नक्कीच दमदार असेल.
नाशिक जिल्हा हा प्रमुख चार हवामान विभागांचा म्हणून ओळखला जातो. कोकण, मध्य महाराष्ट्र, प.
महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सगळ्याची छोटी आवृत्ती म्हणजे नाशिक जिल्हा आहे. एकीकडे तीन
हजार मिमी पाऊस पडणारा इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा भाग, तर दुसरीकडे ३०० मिमी पाऊस असणारा
‘कसमादे’ भाग. अशी विविधता नाशिक जिल्ह्यात आहे. यातून अनेकविध प्रयोग नाशिक जिल्ह्यात
मागील दीडशे वर्षात झालेले आहेत.
भात, नाचणीसारखी पारंपरिक पिके असतील किंवा महाराष्ट्रातील महत्त्वाची खरिपाची सोयाबीन, तूर,
कापूस ही नाशिक जिल्ह्यात होतात. दुसरीकडे द्राक्ष, डाळिंब, कांदा ही फळपिके, फुलपिके आणि सर्व
प्रकारचा भाजीपाला उत्पादनही घेतले जाते. कॉफी, शतावरी, इतकेच काय तर सफरचंद आणि केशर
पिकविण्याचाही प्रयोग नाशिक जिल्ह्यात झाला आहे. काही प्रमाणात त्याला यशही मिळाले आहे.
वनशेतीची चळवळ वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू राहिली. त्यात बांबू,
साग ही पिके नाशिक जिल्ह्यात रुजण्याचा प्रयत्न झाला आहे.
२. नाशिक जिल्हातील कृषी माल निर्यातीमुळे नाशिकच्या अर्थकारणात किती बदल झाला आहे?
उत्तर : भारताच्या एकूणच कृषी प्रगतीत नाशिक जिल्ह्याचे विशेष असे स्थान आहे. या भागातील
कांदा, द्राक्षे, डाळिंब या फळांनी या भागाचे चित्र पालटले आहे. त्याबरोबरच या फळांनी जगभरातील
बाजारात महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. महाराष्ट्रातील या फळांना युरोप, आखातासह जगभरातील
अनेक देशांतून मागणी आहे. निर्यातीच्या बाजारातील संधी पाहता या फळपिकांमध्ये पुढे जाण्यास
प्रचंड वाव आहे.
कांदा : युरोप, अमेरिकेत निर्यातीच्या संधी
कांदा निर्यातीत आपण जगात पहिल्या क्रमांकावर आहोत. आपली निर्यात आखाती देशांबरोबरच
श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया या जवळच्या देशांत होते. जगातील कांद्याच्या निर्यातीत भारताचा वाटा
२० टक्के आहे. या निर्यातीतून कांद्याला फारसा चांगला दर आपल्या पदरात पडत नाही. अमेरिका,
युरोपीय देशांत कांद्याला उत्तम दर मिळतो. तिथे आपला कांदा जात नाही. भारतातील कांद्याचे
निर्यात मूल्य प्रतिकिलोला ०.२६ डॉलर (२२ रुपये) आहे. तेच अमेरिकेतील आयातमूल्य प्रतिकिलोला
०.८६ डॉलर (७७ रुपये) इतके आहे. अमेरिकेत ७७ रुपयांनी कांदा आयात होतो आणि मग तो विकला
जातो. ही स्थिती पाहता अमेरिका, युरोपच्या बाजारात आपल्याला खऱ्या अर्थाने जास्तीचे मूल्य मिळू
शकते. त्या बाजारापर्यंत आपण पोहोचलेलो नाही. त्याची कारणे समजून घेऊन त्यावर काम करणे
गरजेचे आहे. तिथल्या ग्राहकाची अपेक्षा, चव, अन्नसुरक्षेच्या गरजा आणि तिथल्या बाजारपेठेचे निकष
लक्षात घेऊन आपल्याला त्या बाजारपेठांना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने काम करावे लागणार आहे.
त्यातून खऱ्या अर्थाने कांदा उत्पादकांचे उत्पन्न वाढणार आहे.
जगातील द्राक्ष उत्पादन
उत्तर गोलार्धातील देश अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य, युरोपातील स्पेन, इटली हे देश, चीन
दक्षिण गोलार्धातले चिली, ब्राझील, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया
या दोन्हीही गोलार्धातील समशितोष्ण वातावरणात पारंपरिक द्राक्ष उत्पादन घेतले जाते. येथे वर्षातील
फक्त चार महिने द्राक्षे पिकतात. उरलेले आठ महिने तिथे द्राक्ष बाहेरून आयात केले जातात.
याशिवाय भारत, अफ्रिकेतील काही भाग येथे द्राक्ष वर्षातील आठ महिने पिकू शकतात. या नैसर्गिक
अनुकूलतेमुळे जागतिक बाजारपेठेत यांना अधिक संधी तयार होत आहेत.
एकीकडे जास्तीत जास्त दिवस द्राक्ष पुरवठा करण्याची क्षमता, त्याचबरोबर उपलब्ध हवामानात
फळधारणा चांगल्या पद्धतीने होते. यामुळे तुलनेने खर्चही कमी येतो. ही स्थिती पाहता भारत, ब्राझील
या देशांना पुढील काळात चांगले भवितव्य आहे. त्यांनी फक्त जगभरातील ग्राहकाची पसंती लक्षात
घेऊन काम करणे गरजेचे ठरणार आहे.
बहुगुणी डाळिंबातील संधी!
’सुपर फूड’ म्हणून जगात ओळखल्या जाणाऱ्या डाळिंबाला जगभरातील मोठ्या बाजारात मोठी मागणी
आहे. डाळिंब निर्यातीत आपण नगण्य आहोत. जागतिक निर्यातीत महाराष्ट्राचाच १० टक्के वाटा
असणे. शेतकऱ्यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांच्या मालकीची डाळिंबाची ५० हजार कोटींची इंडस्ट्री उभी
करणे. यातून डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला एकरी तीन लाख रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळवून देणे
शक्य आहे. तीच आपली दिशा असली पाहिजे. अमेरिकेसारखा ‘पोमोवंडर’ब्रॅन्ड महाराष्ट्रातील शेतकरी
एकत्र येऊन निर्माण करू शकतात. त्यासाठी डाळिंब शिवारात मूल्यसाखळ्या उभ्या राहण्यासाठी
शेतकऱ्यांनीच पुढे आले पाहिजे.
निर्यात, देशांतर्गत यंत्रणा, फ्रेश उत्पादन, डाळिंबाचे दाणे अशा अनेक वेगवेगळ्या चॅनलची डाळिंबाची
यंत्रणा एका जागेवर उभी राहू शकते. ती उभी करण्यासाठी एक हजार शेतकरी येणे. शेतकऱ्यांच्या
यंत्रणा उभ्या सुसंघटीत राहणे. ही दिशा घेऊन चाललो तर महाराष्ट्रातील डाळिंब शेतीत संधी अफाट
आहेत.
युरोपच्या बाजारात महाराष्ट्रातील द्राक्षांनी जसे भक्कम पाय रोवले आहेत, तसे युरोप, जापानच्या
बाजारात महाराष्ट्रातील कांद्यासह केळी, डाळिंब ही आणि अन्य फळेही विकली गेली पाहिजे. ती दिशा
ठेवून आपण आता वाटचाल करणे गरजेचे आहे.
३. नाशिक जिल्ह्यात कृषी माल प्रक्रिया उद्योगाची स्थिती काय आहे आणि त्यात संधी आणि आव्हाने
कोणती आहेत?
उत्तर : आपल्याकडे ताजा शेतमाल व त्यावरील प्रक्रिया या दोन बाबी वेगवेगळ्या समजल्या जातात.
त्याकडे तुटक स्वरूपातच पाहिले जाते. या दोन बाबी परस्परांपासून वेगळ्या नसून, त्या एकच आहेत
व शेती उद्योगाचा विचार करतांना त्या दोघींचा एकत्रित आणि एकात्मिक स्वरूपातच विचार करायला
हवा. हीच शेतीप्रक्रियेची पुढील पाच वर्षांची दिशा असायला हवी.
शेतमालाच्या मूल्यसाखळीत प्रक्रियेचा स्वतंत्र भाग न समजता याकडे ‘काढणीनंतरचे व्यवस्थापन’ या
स्वरूपात पाहिले पाहिजे. भारतीय बाजारपेठेचा विचार करता हेच अधिक सुसंगत असून शेतकरी आणि
ग्राहकाच्या हिताचेही आहे. भविष्यातील शेतीच्या उन्नतीसाठी फ्रेश ताजा शेतमाल आणि शेतमाल
प्रक्रिया या दोन्हीही गोष्टी एकात्मिक स्वरूपात हातात हात घालूनच पुढे जाणे गरजेचे राहणार आहे.
प्रक्रियेचा विरोधाभास
जेव्हा शेतीमालाचे भाव पडतात, रस्त्यावर टोमॅटो फेकले जातात, कांदा चाळीत सडतो, शेतात वाया
जातो, त्या वेळेला ‘शेतीमालावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. प्रक्रिया झाल्याशिवाय आपल्या शेतीमालाला
भाव मिळणार नाही’. अशा सहज प्रतिक्रिया सगळीकडून सुरू होतात. देशात दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर
शेतमाल पिकतो. फळभाज्यांसारख्या पिकांमध्ये ३० टक्क्यांपर्यंत शेतीमाल तयार झाल्यानंतर फेकावा
लागतो. तर, धान्यपिकांत साठवणुकीत ६ ते ७ टक्के धान्य वाया जाते. काढणीनंतरच्या हाताळणीची
व्यवस्था होणे गरजेचे आहे. हे ही तितकेच वास्तव चित्र आहे.
एकीकडे आपण म्हणतो, की भारतात जितका शेतमाल पिकतो. त्यापैकी फक्त दोन टक्के शेतीमालावर
प्रक्रिया होते. अमेरिकेत ४० टक्के शेतमालावर प्रक्रिया होते. थायलंड सारख्या देशांत ६० टक्के
शेतमालाची प्रक्रिया होते. चीन मध्ये ३५ टक्क्यांपर्यंत शेतमालाची प्रक्रिया होते. अशावेळी प्रक्रिया हाच
पर्याय आहे असे आपण म्हणतो. त्याचवेळी दुसरीकडे गरज असूनही पाहिजे त्या प्रमाणात प्रक्रिया होत
नाही, हा विरोधाभास सातत्याने आपल्याला दिसतो. यातील गुंता नीट समजून घेण्याची गरज आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात टोमॅटोचे दर प्रति २० किलोच्या क्रेटला ९
रुपयांपर्यंत खाली घसरले होते. दर कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत
होते. या वेळी टोमॅटो प्रक्रियेच्या यंत्रणा मोठ्या प्रमाणात तयार व्हायला हव्यात असे प्रत्येक जण बोलत
होता. त्यानंतर एकाच महिन्यात हे दर प्रति क्रेटला ९०० पर्यंत वाढले. त्याचे कारण बाजारातून
टोमॅटोला मागणी वाढली. या वेळी मात्र टोमॅटोच्या प्रक्रियेबाबतची चर्चा कुणीच करताना दिसून आले
नाही. एका महिन्यात टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार आपण अनुभवतो. याचा अर्थच
असा आहे, की फ्रेश उत्पादनांसाठीही संधी नेहमी असते. त्यासाठी आधी फ्रेश मार्केट व त्याला दर
कोसळेल त्यावेळी प्रक्रिया असे सूत्र ठेवले तर टोमॅटोसह कुठल्याही पिकाचा शेती उद्योग शाश्वत
होण्यास मदत होईल.
त्रुटी दुरुस्त व्हाव्यात
एकंदरीत शेतमाल प्रक्रियेच्या बाबतीत आपल्याकडे परस्परविरोधी चित्र तयार झालेले दिसते. एकीकडे
आपल्याला प्रक्रियेची गरज आहे असे म्हणत आपण इतर देशांतील प्रक्रियेच्या प्रमाणाशी तुलना
करतोय. त्याच वेळी त्या संदर्भातील आपल्याकडील सरकारी, सहकारी, खासगी यंत्रणा तोट्यात
जातानाही बघत आहोत. त्या तोट्यात जाण्याची जी काही कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे या
उभ्या केलेल्या प्रक्रिया यंत्रणा होय. येथील शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे व ग्राहकांच्या दृष्टीकोनातूनही त्या
व्यवस्थित उभ्या केलेल्या नाहीत. त्यात भरपूर त्रुटी राहिलेल्या आहेत. त्या त्रुटी दुरुस्त केल्या तरच
वेगळ्या प्रकारचे आशादायी चित्र येत्या काळात दिसेल.
भारतीय मॉडेल हवे
बाजार समिती, प्रक्रिया या दोन बाबी एकमेकांना पूरक असणे गरजेचे होते. मात्र आतापर्यंत या
स्वरूपाचे काम तुटक पद्धतीने झाले आहे. फ्रेशची यंत्रणा वेगळी, प्रक्रियेची यंत्रणा वेगळी असे
केल्यामुळे आपण या व्यवस्थांचा प्रभावी उपयोग करू शकलो नाही. या व्यवस्था शेतकऱ्यांच्या हातात
कधीच राहिल्या नाहीत. ही यातील दुसरी महत्त्वाची समस्या राहिली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनीच उभ्या केलेल्या या एकात्मिक स्वरूपाच्या यंत्रणा उभ्या
राहिल्या तर आपल्याला भारतात वेगळे चित्र दिसू लागेल. आपल्यासाठी अमेरिकेचे किंवा थायलंडचे
मॉडेल जसेच्या तसे चालणार नाही. भारतीय परिस्थितीचा अभ्यास करुन केलेले भारतीय पद्धतीचे
मॉडेल गरजेचे आहे.
आपल्याकडे फ्रेशच्या मालाची मागणी असलेली बाजारपेठ आहे. कारण भारताची १३८ कोटी ही
जगातील क्रमांक दोनची लोकसंख्या हीच मोठी संधी आहे. त्यामुळे तिचा योग्य पद्धतीने फायदा कसा
घेता येईल या दृष्टीने आपले काढणी पश्चात व्यवस्थापन असायला हवे. त्याचबरोबर जागतिक
बाजारात आपण गुणवत्तापूर्ण व कार्यक्षम शेती प्रक्रिया उत्पादने निर्यात पुढील काळात मोठ्या प्रमाणात
करू शकतो तेवढी नैसर्गिक ताकद आपल्यात आहे.