रेशीम शेती हा कमी भांडवलावर सुरू करता येण्याजोगा कुटीर उद्योग आहे. म्हणून तर म्हटलं जातं. सिल्क आणि मिल्क असे दोन्ही जोडधंदे शेतकऱ्यांनी केले तर त्यांची आर्थिक उन्नती निश्चितच आहे. रेशीम उद्योगात जागतिक पातळीवर चीनची आघाडी आहे. त्यांच्याकडून भारत रेशमी धागा आयात करतो. अशा परिस्थितीत आपल्या देशात याचे उत्पादन वाढवून आपली गरज भागवण्यासोबत अन्य देशांना देखील मागणीप्रमाणे रेशीमधागे पुरवण्याची संधी आपल्या हातात आहे.
कर्नाटक,तामिळनाडू या राज्यांमध्ये रेशीम उद्योग जास्त प्रमाणात विकसित झाला आहे. रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अग्रेसर असलेले पहिले राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास अत्यंत अनुकूल आहे. रेशीम शेती हा एक पूरक उद्योग म्हणून पुढील बाबी विचारात घेता शेतकऱ्यास एक वरदान ठरणार आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात तुती लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे.
पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीच्या प्रकारात तुती लागवड करून रेशीम उद्योगाची सुरुवात करता येते. मात्र चांगल्या जमीनीत उत्पादन जास्त येते. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर तुतीपाल्याचे कीटक संगोपनात दहा ते पंधरा वर्षापर्यंत उपयोग होत असल्याने दरवर्षी याचा लागवड खर्च पुन्हा पुन्हा करावा लागत नाही. अल्प भांडवलाची गुंतवणूक करून मासिक पगारासारखा उत्पन्न मिळून देणारा हा उद्योग आहे.
या उद्योगांमध्ये घरातील वृद्ध, लहान मुले, स्त्रिया, अपंग व्यक्ती देखील आपला सहभाग देऊ शकतात. त्यामुळे कीटक व संगोपनाचे काम घरच्या घरी करू शकतात. मजुरांची आवश्यकता नसते. इतर बागायती पिकापेक्षा तुतीबाग जोपासण्याकरीता १/३ पाणी लागते. कच्चा मालाची उपलब्धता याची शाश्वती व तयार होणाऱ्या पक्का मालाच्या खरेदीची हमी असणारा हा एकमेव उद्योग आहे.
एक एकर तुती लागवड वरती संगोपनाच्या वेळी कीटकांनी खाऊन शिल्लक राहिलेला पाला, फांद्या आणि विष्ठा यावर दोन दुभत्या जनावरांच्या दुधाचे वाढीस खाद्य म्हणून उपयोग होऊ शकतो. रेशीम किटकाच्या विष्ठेचा उपयोग बायोगॅससाठी केला जाऊ शकतो. रेशीम शेती उद्योग ग्रामीण भागात प्रत्यक्ष व प्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होत असल्याने शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यात आपोआपच मदत होते.
रेशीम शेती उद्योगातील निर्मित कोषापासून रेशीम धागा व त्यापासून वस्त्र तयार करतात. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यात जंगलातील अर्जुन वृक्षावर ‘टसर’ रेशीम उद्योगालाही प्रचंड भाव आहे. तुतीची लागवड करून पानांची निर्मिती करणारे मोठे शेतकरी तुतीच्या फांद्या कीटक संगोपनासाठी अथवा कीटक संगोपन केंद्रांना विक्री करून व त्याचे उत्पन्न दोघांनाही मिळू शकते.
रेशीम संगोपनासाठी निरोगी अंडीपुंज तयार करून विक्री करणे, चॉकी कीटक संगोपन करणे, रेशीम कीटक संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची विक्री करणे, केवळ प्रौढावस्थेतील अळ्यांचे संगोपन करून कोश निर्मिती करणे, कोश खरेदी करून त्यापासून धागा गुंडाळण्याची प्रक्रिया करणे, रेशीम धाग्यापासून हातमाग व यंत्रमाग यावरून वस्त्र विणणे, रेशीम वस्त्रावर रंगाई व छपाई काम करणे, त्याच्या वस्तू तयार करणे व त्याची विक्री करणे, रेशीम निर्मितीसाठी लागणारी साधने निर्माण करणे जसे संगोपन साहित्य, प्रक्रिया साहित्याचे उत्पादन व दुरुस्ती करणे या प्रकारचे विविध कामकाज करू शकतो.
रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या योजना कार्यरत आहेत. मनरेगा योजनेअंतर्गत प्रती एकर अनुदान दिले जाते. शासनामार्फत रेशीम उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.