एटीएम न्यूज नेटवर्क ः जगात निर्माण झालेल्या भू-राजकीय परिस्थितीमुळे पश्चिम आशिया आणि मलेशियामध्ये भारतीय अंड्यांची मागणी वाढली असून, केरळमधून उबविलेल्या अंड्याच्या निर्यातीत गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. या आशयाचे वृत्त अपेडाने द हिंदूच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
चार आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेल्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विविध देशांमध्ये विशेषत: पश्चिम आशियाई शहरे आणि काही सुदूर पूर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मालवाहू विमाने जातात. अलीकडच्या काही महिन्यांत भारतीय अंड्यांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे, असे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील निर्यातीच्या डेटावरून दिसून आले आहे.
कोचीन विमानतळावरून नोव्हेंबरमध्ये सुमारे 2.016 टन आणि ऑक्टोबर 2022 मध्ये 2.372 टन अंड्यांची निर्यात झाली. डिसेंबर 2022 मध्ये 10.649 टन आणि नंतर फेब्रुवारी 2023 मध्ये 11.742 टनांवर निर्यात झाली.
पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव टी. एस. प्रमोद म्हणाले, की कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेमुळे भारतीय अंड्यांचा निर्यात बाजार उंचावला असून, कतारने भारतातून अंड्यांचा प्रचंड साठा आयात केला आहे. विशेषत: तामिळनाडूमधील नमक्कल हे देशातील कुक्कुटपालन क्षेत्रात अंडी उबविण्याचे केंद्र मानले जाते.
फिफा विश्वचषकादरम्यान अंड्यांची मागणी पूर्ण करण्याची भारताची कामगिरी पाहून मलेशिया हा देशही भारतीय अंड्यांच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक म्हणून उदयास आला. मलेशिया हा जगातील सर्वात मोठा अंड्याचा निर्यातदार देश असला तरी, 2023 मध्ये त्यांच्या देशांतर्गत उत्पादनावर रशियाने-युक्रेन युद्धामुळे झालेल्या कोंबड्यांच्या खाद्याच्या किमतीत वाढ आणि इतर अनेक कारणांमुळे मोठा फटका बसला होता, असे श्री. प्रमोद म्हणाले.
कोंबड्यांच्या खाद्यामधील प्रमुख घटक असलेला मका आणि सोयाबीन युक्रेनमधून आयात केला जातो. जागतिक संकेत आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे भारतीय अंड्याची मागणी वाढली असली तरी, केरळला निर्यात बाजाराचा मोठा फायदा नाही. कारण केरळमध्ये अंड्याचे व्यावसायिक उत्पादन जवळपास शून्य आहे.
नमक्कलमधून दररोज सुमारे 12 दशलक्ष अंडी मिळवून केरळ अजूनही तामिळनाडूवर अवलंबून आहे. प्रमुख ठिकाणांवरील वाहतुकीच्या सोयीमुळे निर्यातदारांना मालवाहतूक करण्यास केरळ आकर्षित करते. हा केरळमधील निर्यात व्यापाऱ्यांसाठी एक अतिरिक्त फायदा आहे, असे केरळ निर्यात मंचाचे सचिव मुन्शीद अली यांनी सांगितले.
(स्रोत ः अपेडा)