एटीएम न्यूज नेटवर्क ः कृषीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासह पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी बांबूचा वापर विविध पद्धतीने वाढताना दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात महामार्गावर बांबूचा वेगळ्या पद्धतीने वापर करण्यात आला असून, हा जगातील प्रहिलाच प्रयोग ठरला आहे.
यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावर बांबूंनी बनविलेले जगातील पहिले क्रॅश बॅरियर (अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसविले जाणारे लोखंडी अडथळे) बसविण्यात आले आहेत. या महामार्गावर २०० मीटरचा प्राथमिक टप्पा बसविण्यात आला असून, बांबू क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड मानला जात आहे.
या प्रकल्पाला ‘बाहुबल्ली’ असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच ट्विटच्या मालिकेद्वारे याची माहिती दिली. ट्विटमध्ये ते लिहितात, वणी-वरोरा महामार्गावर बसविलेल्या जगातील पहिल्या 200 मीटर लांबीच्या बांबू क्रॅश बॅरियरने आत्मनिर्भर भारत मोहीम साध्य करण्याच्या दिशेने एक विलक्षण कामगिरी केली आहे.
गडकरी ट्विटमध्ये लिहितात, की बांबू क्रॅश बॅरियरला बाहुबल्ली असे नाव देण्यात आले आहे. पिथमपूर, इंदूर येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक सारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये कठोर चाचणी घेण्यात आली.
तसेच रुरकी येथील सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आयोजित आगविरोधी चाचणीदरम्यान वर्ग 1 म्हणून गणण्यात आले आहे. शिवाय याला इंडियन रोड काँग्रेसनेही मान्यता दिली आहे. बांबूच्या अडथळ्यांचे पुनर्वापर मूल्य 50-70% आहे, तर लोखंडी अडथळ्यांचे 30-50% आहे.
हा अडथळा बनविण्यासाठी वापरण्यात येणारी बांबूची प्रजाती म्हणजे बांबुसा बालकोआ, ज्यावर क्रिओसोट तेलाने प्रक्रिया केली गेली आहे. तसेच पुनर्नवीनीकरण केलेल्या हाय-डेन्सिटी पॉली इथिलीनचा लेप लावण्यात आला आहे. हे यश बांबू क्षेत्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी उल्लेखनीय आहे.
क्रॅश बॅरियर हे लोखंडी अडथळ्यासाठी परिपूर्ण पर्याय असून, ते पर्यावरणविषयक चिंता आणि त्यांच्या नंतरच्या समस्यांचे निराकरण करू शकते. ग्रामीण भागात कृषीपूरक व्यवसाय म्हणून याला मान्यता मिळू शकते. म्हणूनच ते आणखी महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरते, असेही श्री. गडकरी म्हणाले.