एटीएम न्यूज नेटवर्क ः बेस्ट अॅग्रोलाइफ लिमिटेड या भारतातील अग्रगण्य कृषी रसायन कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत २०२३ आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले. कंपनीने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत आणि गेल्या 9 महिन्याच्या महसुलात लक्षणीय वाढ नोंदवली आहे.
कंपनीचा महसूल वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीत 232.5 कोटी रुपयांवरून वाढून वार्षिक 41 टक्के म्हणजेच 327.8 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या 9 महिन्यात कंपनीचा महसूल 901 कोटींच्या तुलनेत 1492 कोटी रुपये इतका म्हणजेच 65.5 टक्क्यांनी वाढला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाही आणि कालावधीतील कामगिरीवर भाष्य करताना बेस्ट अॅग्रोलाइफ लि. चे व्यवस्थापकीय संचालक विमल अलावधी म्हणाले, आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, एक दुबळा हंगाम असूनही बीएएलने कामगिरीत सातत्य राखण्यात यश मिळवले आहे. या कालावधीत कंपनीने सर्व व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून वाढ दर्शविली आहे. आम्ही आमच्या जागतिक निर्यात विस्तारावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी यासाठी सज्ज असून, नवीन आणि विशेष पेटंट उत्पादने जसे की रोन्फेन आणि इतर विविध विभागातील उत्पादने सादर केल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात आमची आणखी वाढ होईल.
बीएएलच्या सायहॅलोफॉप-बूटिल आणि प्रोपॅक्विझेफॉप या तांत्रिक स्वदेशी उत्पादनांची नुकतीच नोंदणी झाली आहे. बीएएल ही एक संशोधन आधारित कंपनी असून, पीक उत्पादकता सुधारण्यासाठी कृषी उद्योगात जागतिक दर्जाची आणि किफायतशीर पीक उपाय सादर करण्यावर लक्ष केंद्रित करते. सध्या बीएएलकडे गजरौला, ग्रेटर नोएडा आणि जम्मू आणि काश्मीरमधील तीन उत्पादन प्रकल्पांद्वारे अनुक्रमे 7,000 एमटीपीए आणि 30,000 एमटीपीए इतकी तांत्रिक आणि सूत्रीकरण उत्पादन क्षमता आहे. बीएएलचे भारतात 5200 पेक्षा जास्त वितरक आहेत.