‘कृषीथॉन २०२६’ ची १९वी आवृत्ती नाशिकच्या माडसांगवीत; २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान भव्य आयोजन - Agri Trade Media
SUBSCRIBE E-Paper
English मराठी
AGRI NEWS

‘कृषीथॉन २०२६’ ची १९वी आवृत्ती नाशिकच्या माडसांगवीत; २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान भव्य आयोजन

Oct 07, 2026
News Image

नाशिक: भारतीय शेतीला आधुनिकतेची आणि नवतंत्रज्ञानाची नवी दिशा दाखवणारे देशातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन ‘कृषीथॉन’ यंदा आपल्या १९व्या आवृत्तीसह अधिक भव्य रूपात सजणार आहे. येत्या २६ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान नाशिकमधील छत्रपती संभाजीनगर रोडवरील माडसांगवी या नव्या आणि प्रशस्त स्थळी हे आयोजन होत असून “अधिक व्यापक... अधिक शाश्वत... अधिक संधी...” ही यंदाची मुख्य संकल्पना असणार आहे, अशी माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

कृषीथॉन हे शेतकरी, कृषी उद्योजक, संशोधक आणि धोरणकर्त्यांना एकाच व्यासपीठावर आणणारे हे भारतातील सर्वांत प्रभावी कृषी प्रदर्शन ठरले आहे. दरवर्षी १.२५ लाखांहून अधिक शेतकरी, ३०० हून अधिक प्रदर्शनार्थी आणि ५ कोटींहून अधिक डिजिटल प्रेक्षक याशी जोडले जातात. पारंपरिक शेतीपासून सुरू झालेला हा प्रवास आज एआय (AI), ड्रोन तंत्रज्ञान आणि अचूक शेती पद्धतींपर्यंत येऊन पोहोचला आहे.

कृषीथॉनचे मुख्य उद्दिष्ट आणि ध्येय
देश-विदेशातील अद्ययावत कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे हे कृषीथॉनचे प्राथमिक ध्येय आहे. आधुनिक सिंचन, जैविक खते आणि अन्नप्रक्रियेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पिकांचे मूल्यवर्धन करणे आणि ग्रामीण तरुणांना कृषी उद्योजकतेकडे वळवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच, शेतकरी, वैज्ञानिक आणि तज्ज्ञांमध्ये थेट संवाद घडवून आणत कृषी क्षेत्रातील समस्यांवर शाश्वत उपाय शोधण्याचे काम कृषीथॉन सातत्याने करत आहे.

‘कृषीथॉन २०२६’ यंदा माडसांगवी येथे!
आगामी कुंभमेळा व शहरातील विकासकामांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक कोंडी टाळून शेतकरी व अभ्यागतांना सुलभ प्रवास व्हावा, यासाठी यंदाचे ‘कृषीथॉन’ माडसांगवी (जि. नाशिक) या नव्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, दिंडोरी व आग्रा रोडने येणाऱ्या शेतकऱ्यांना शहरात न जाता थेट प्रदर्शन स्थळी पोहोचणे यामुळे शक्य होईल. ग्रामीण भागाच्या अधिक जवळ असलेल्या या नव्या जागेत भव्य प्रदर्शन हॉल, विस्तीर्ण पार्किंग व्यवस्था आणि ४० हून अधिक पिकांच्या लाईव्ह प्रात्यक्षिकांसाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

३००+ नावीन्यपूर्ण स्टॉल्स आणि आधुनिक तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभाची संधी
कृषीथॉनमध्ये ३०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्टॉल्सच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे संपूर्ण तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यात हायटेक ट्रॅक्टर्स, अवजारे, सूक्ष्म व तुषार सिंचन, सोलर पंप आणि ड्रोन, AI सेन्सर्ससारख्या अत्याधुनिक प्रणालींची थेट प्रात्यक्षिके पाहायला मिळतील. सोबतच संकरित बियाणे, सेंद्रिय खते, ग्रीनहाऊस आणि अन्नप्रक्रिया, गोठा व्यवस्थापनासारख्या शेतीपूरक उद्योगांचे स्टॉल्स विशेष आकर्षण असतील. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना ॲग्री-स्टार्टअप्स, कृषी कर्ज, शासकीय अनुदानाची माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळेल, ज्यामुळे वेळ वाचून उत्पादन खर्च कमी होईल आणि नफा वाढण्यास मदत होईल.

कृषी तज्ज्ञांची चर्चासत्रे आणि हवामान समर्थ शेतीवर विशेष भर
प्रदर्शनाच्या पाचही दिवशी आयोजित कृषी तज्ज्ञ, अधिकारी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांची चर्चासत्रे हे कृषीथॉनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यात पीक पद्धती, कीड-रोग नियंत्रण आणि हवामान बदलाच्या काळात पीक संरक्षणावर थेट संवाद साधला जाईल. तसेच हवामान समर्थ शेती, जलसंधारण, मृदा आरोग्य आणि हवामान अंदाजावर आधारित शेती नियोजनावर विशेष भर दिला जाईल. यामुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, पॅकेजिंग, मार्केटिंग व निर्यातीचे तंत्र समजून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

News Image 2

‘कृषीथॉन सन्मान २०२६’ चे वितरण
कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढ आणि सामाजिक योगदान यांची दखल घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही 'कृषीथॉन सन्मान २०२६' प्रदान केले जाणार आहेत. आतापर्यंत २,००० हून अधिक गुणवंतांना सन्मानित करण्यात आले आहे. यंदा प्रयोगशील शेतकरी (पुरुष), प्रयोगशील शेतकरी (महिला), प्रयोगशील कृषी उद्योजक, प्रयोगशील कृषी संशोधक, कृषी विस्तार कार्य आणि गुणवंत कृषी विद्यार्थी अशा सहा प्रमुख गटांमध्ये हे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातील.

बळीराजाची उत्सुकता ताणली; प्रदर्शनाची आतुरतेने वाट!
गेल्या २८ वर्षांचा विश्वास आणि यशाची परंपरा असलेला कृषीथॉन हा संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक ‘कृषी महोत्सव’ बनला असून २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान होणारा हा तंत्रज्ञानाचा उत्सव भारतीय शेतीला नक्कीच एक नवी दिशा देणारा ठरेल.

News Image 3