एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतातील सर्वाधिक साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील दोन डझनहून अधिक साखर कारखान्यांनी प्रतिकूल हवामानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन महिने अगोदर फेब्रुवारीच्या अखेरीस ऊस गाळप थांबविले आहे, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे महाराष्ट्रात 13.8 दशलक्ष टन इतक्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा खूपच कमी साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता असून, देशाच्या एकूण उत्पादनात घट होणार आहे.
इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार असलेल्या भारताला साखरेचे उत्पादन कमी झाल्यास अतिरिक्त निर्यात करता येणार नाही. तसेेच संभाव्य जागतिक किंमत वाढून प्रतिस्पर्धी देश ब्राझील आणि थायलंड या देशांची साखर निर्यात वाढणार आहे.
भारताच्या साखर उत्पादनापैकी एक तृतीयांश पेक्षा अधिक वाटा असलेल्या महाराष्ट्राने 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या 2022/23 विपणन वर्षात 9.51 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या हंगामात याच टप्प्यावर 9.73 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले.
सोलापूर विभागात 13 साखर कारखाने बंद झाले असून, आणखी 20 कारखाने येत्या पंधरवड्यात बंद होतील," असे राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
सुमारे दोन डझन साखर कारखाने वगळता राज्यातील सर्व कारखाने मार्चच्या अखेरीस बंद होतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्रात उसाचे भरघोस उत्पादन झाल्यामुळे 2021/22 मध्ये जूनच्या मध्यापर्यंत साखर कारखाने कार्यरत होते.
(स्रोत - इकॉनॉमिक्स टाइम्स)