एटीएम न्यूज नेटवर्क ः देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या दोन-तीन आठवड्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांना फटका बसला असून, हाताशी आलेल्या पिकांचे मातेरे झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर साखर उद्योगासंदर्भात महत्त्वाची बातमी आली आहे.
अवकाळी पावसाचा महाराष्ट्रातील उसाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने केंद्र सरकार यावर्षी अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता नाही, असे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले.
अन्न मंत्रालयाने चालू 2022-23 विपणन वर्षासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) 6 दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 4 दशलक्ष टन निर्यात झाली आहे, असे व्यापार अहवालात म्हटले आहे.
"आमचे 38.6 दशलक्ष टन साखर उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. (इथेनॉलसाठी वळविण्यासह) महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे उत्पादन २ ते ३ लाख टनांनी कमी होईल," असे चोप्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता लक्षात घेता ते म्हणाले, "अतिरिक्त साखर निर्यात कोट्याला परवानगी मिळण्याची शक्यता नाही."
ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठा साखर उत्पादक देश असलेल्या भारतातील साखरेचे उत्पादन सप्टेंबरमध्ये संपलेल्या 2022-23 विपणन वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 29.96 दशलक्ष टनांवर म्हणजेच तीन टक्क्यांनी कमी राहिले आहे, असे उद्योग संस्था आयएसएमएने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. मागील विपणन वर्षात भारताने विक्रमी 11 दशलक्ष टन साखर निर्यात केली होती.