एटीएम न्यूज नेटवर्क ः भारताने 24 मार्चपर्यंत 74.86 लाख टन युरियाची आयात केली असून, या आर्थिक वर्षात युरियाची वार्षिक घट नोंदवली जाणार आहे, अशी माहिती रसायने आणि खत राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी राज्यसभेत लेखी उत्तर देताना दिली. या वेळी त्यांनी गेल्या पाच वर्षांतील युरियाच्या आयातीचा तपशील सामायिक केला. या आशयाचे वृत्त इकोनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.
श्री. खुबा यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात 24 मार्चपर्यंत देशात 74.86 लाख टन युरिया आयात झाला आहे. 2021-22 आर्थिक वर्षात 91.36 लाख टन, 2020-21 मध्ये 98.28 लाख टन, 2019-20 मध्ये 91.23 लाख टन आणि 2018-19 मध्ये 74.81 लाख टन युरियाची आयात झाली.
वरील माहितीवरून हे कळू शकते, की 2018-19 ते 2020-21 या वर्षात युरियाची आयात वाढली आहे. तथापि 2021-22 आणि 2022-23 या वर्षात ती कमी झाली आहे, असे खुबा म्हणाले.
आयएफएफसीओने 1 ऑगस्ट 2021 पासून नॅनो द्रव्यरूप युरियाचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले. गेल्या आर्थिक वर्षात नॅनो युरियाचे 290 लाख बाटल्या (प्रत्येकी 500 मिली) आणि या आर्थिक वर्षात 21 मार्चपर्यंत 452.11 लाख बाटल्यांचे उत्पादन झाले होते.