एटीएम न्यूज नेटवर्क ः या वर्षी देशांतर्गत उत्पादन अंदाजे 33.6 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचल्यास ब्राझीलनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश असलेला भारत 1 दशलक्ष टन अतिरिक्त साखर निर्यात करू शकतो, अशी माहिती अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
देशांतर्गत साखरेच्या उत्पादनाचे मूल्यांकन केल्यानंतर सरकार निर्यातीला अधिक प्रमाणात परवानगी देण्याबाबत पुढील महिन्यात निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. या आशयाचे वृत्त अपेडाने द इकोनॉमिक्स टाइम्सच्या हवाल्याने प्रसिद्ध केली आहे.
देशात साखरेची उपलब्धता समाधानकारक असून, घाऊक आणि किरकोळ किमती गेल्या एका महिन्यात घसरत आहेत. अन्न मंत्रालयाने चालू 2022-23 विपणन वर्षासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) 6 दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे.
मागील वर्षी भारताने विक्रमी 11 दशलक्ष टन साखर निर्यात केली होती. चालू विपणन वर्षाच्या 2022-23 च्या फेब्रुवारीपर्यंत साखरेचे उत्पादन यापूर्वीच 24.7 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. कारखान्यांनी यावर्षी आतापर्यंत 4.3 दशलक्ष टन साखर निर्यातीसाठी पाठवली आहे, असे ते म्हणाले.
देशात उसाचे गाळप पुढील महिन्यापर्यंत समाप्त होण्याची शक्यता आहे. अंतिम उत्पादन आकडेवारीचे मूल्यांकन केल्यानंतर सरकार निर्यातीचा आढावा घेणार आहे, असेही ते म्हणाले.
अन्न मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, साखरेच्या उत्पादनात पहिल्या तीन उत्पादक राज्यांमध्ये घट झाल्यामुळे 2022-23 विपणन वर्षासाठी देशातील साखरेचे उत्पादन 33.6 दशलक्ष टन इतके कमी असल्याचा अंदाज आहे.
देशातील आघाडीचे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 2022-23 विपणन वर्षात 12 दशलक्ष टन इतके कमी राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी राज्यात 13.7 दशलक्ष टन उत्पादन झाले होते.
उत्तर प्रदेशातील उत्पादन 10.2 दशलक्ष टनांच्या तुलनेत किरकोळ कमी होऊन 10 दशलक्ष टनांवर येण्याची शक्यता आहे. तर, कर्नाटकमधील उत्पादन 5.5 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कर्नाटकमध्ये 6.2 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते.
या वर्षी सुमारे 5 दशलक्ष टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविली जाईल. गेल्या वर्षी 3.6 दशलक्ष टन इतकी साखर इथेनॉलनिर्मितीसाठी वळविण्यात आली होती.
कमी साखर उत्पादनाचा अंदाज असूनही अधिकाऱ्याने सांगितले की, भारताची साखरेची एकूण उपलब्धता 2022-23 मध्ये 40.1 दशलक्ष टन असेल. ज्यामध्ये 7 दशलक्ष टन साखर मागील साठ्यातून (कॅरी-ओव्हर) पुढे ढकलण्यात आली आहे.
सुरुवातीला मागील साठा 6.1 दशलक्ष टन असण्याचा अंदाज होता. परंतु राज्य सरकारांनी साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर तो वाढून 7 दशलक्ष टन झाला आहे. पुरवठ्याची कोणतीही चिंता नाही आणि घाऊक तसेच किरकोळ दोन्ही किंमती गेल्या एका महिन्यात घसरत आहेत, असे अधिकाऱ्याने ठामपणे सांगितले.
३ मार्च रोजी साखरेचा घाऊक भाव ३,८४१ रुपये प्रति क्विंटल होता. एका महिन्यापूर्वी ३,८६० रुपये प्रति क्विंटल होता. साखरेच्या किरकोळ किमतीतही किरकोळ घट झाली असून, ती 41.61 रुपये प्रति किलो इतकी होती. महिन्यापूर्वी ती 41.8 प्रति किलो होती.
उसाच्या थकबाकीबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, चालू वर्ष हे सर्वोत्तम वर्षांपैकी एक आहे. कारण साखर कारखानदारांनी जास्तीत जास्त थकबाकी जमा केली आहे. 2021-22 विपणन वर्षात देय असलेल्या 1,18,271 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी केवळ 432 कोटी रुपये प्रलंबित आहेत.
त्याचप्रमाणे चालू 2022-23 विपणन वर्षात कारखान्यांकडे आतापर्यंत उत्पादकांना देय असलेल्या 69,381 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी स्पष्ट 77 टक्के आहे. सुमारे 15,842 कोटी रुपये प्रलंबित आहेत, जे लवकरच अदा केले जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.
(स्रोत - अपेडा)