कृषी, प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांच्या निर्यातीबाबत गेल्या नऊ महिन्यातील काय आहे स्थिती?
एटीएम न्यूज नेटवर्क ः चालू आर्थिक वर्षाच्या (2022-23) नऊ महिन्यांत भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढून 19.694 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे. केंद्र सरकारच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्स विभागातर्फे ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये अपेडाच्या उत्पादनांची एकूण निर्यात 17.5 बिलियन डॉलरवरून वाढून 19.7 बिलियन डॉलर इतकी झाली आहे.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) ने घेतलेल्या पुढाकारांमुळे देशाला 2022-23 या वर्षातील एकूण निर्यात लक्ष्यापैकी 84 टक्के लक्ष्य गाठण्यास मदत झाली आहे.
2022-23 या वर्षासाठी अपेडातर्फे कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचे 23.6 अब्ज डॉलर निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. परंतु अपेडाने चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यातच 19.694 बिलियन डॉलरची निर्यात आधीच गाठली आहे.
डीजीसीआयएसच्या आकडेवारीनुसार प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्यांनी 30.36 टक्के (एप्रिल-डिसेंबर 2022) वाढ नोंदवली. तर ताजी फळे आणि भाज्यांनी मागील वर्षाच्या समान महिन्यांच्या तुलनेत चार टक्के वाढ नोंदवली.
तसेच तृणधान्ये तयार करणे आणि विविध प्रक्रिया केलेले पदार्थ यांसारख्या प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांमध्ये मागील वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांच्या तुलनेत 24.35 टक्के वाढ नोंदवली गेली.
एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये ताज्या फळांची 1078 दशलक्ष डॉलर इतकी निर्यात करण्यात आली होती. तीच निर्यात चालू आर्थिक वर्षातील याच महिन्यांमध्ये 1121 दशलक्ष डॉलर इतकी वाढली आहे. प्रक्रिया केलेल्या फळे आणि भाज्यांची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत 1129 दशलक्ष डॉलरवरून 1472 दशलक्ष डॉलरवर पोहोचली आहे.
डाळींच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत 80.38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण गेल्या आर्थिक वर्षाच्या समान महिन्यांच्या तुलनेत मसूर डाळीची निर्यात 242 दशलक्ष डॉलर (एप्रिल-डिसेंबर 2021-22) वरून 436 दशलक्ष डॉलर (एप्रिल-डिसेंबर 2022-23) इतकी वाढली आहे.
बासमती तांदळाच्या निर्यातीत 2022-23 या आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत 40.26 टक्के वाढ झाली आहे. बासमती तांदळाची निर्यात 2379 दशलक्ष डॉलरवरून (एप्रिल-डिसेंबर 2021) 3337 दशलक्ष डॉलर (एप्रिल-डिसेंबर 2022) पर्यंत वाढली आहे. गैरबासमतीची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत 4 टक्के वाढ नोंदवली. गैरबासमती तांदळाची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत 4663 दशलक्ष डॉलर झाली आहे. जी मागील वर्षीच्या याच महिन्यांतील 4512 दशलक्ष डॉलर इतकी होती.
चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत कुक्कुटपालन उत्पादनांच्या निर्यातीत 91.70 टक्के वाढ झाली असून, इतर धान्यांच्या निर्यातीत 13.64 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कुक्कुटपालन उत्पादनांची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत 95 दशलक्ष डॉलर झाली आहे. जी मागील वर्षीच्या याच महिन्यांत 50 दशलक्ष डॉलर इतकी होती.
त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थांनी 19.45 टक्के वाढ नोंदवली आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये या पदार्थांची निर्यात 471 दशलक्ष डॉलर झाली आहे. मागील वर्षीच्या याच महिन्यातील निर्यात 395 दशलक्ष डॉलर इतकी होती.
चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत गव्हाच्या निर्यातीत 4 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये गव्हाची निर्यात 1452 दशलक्ष डॉलरवरून एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 1508 दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे.
इतर तृणधान्यांची निर्यात एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये 764 दशलक्ष डॉलरवरून एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 869 दशलक्ष डॉलर झाली. एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये दळलेल्या उत्पादनांची निर्यात 188 दशलक्ष डॉलरवरून एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये 255 दशलक्ष डॉलरपर्यंत वाढली. नऊ महिन्यांत 35.71 टक्के वाढ झाली आहे.
भारतीय वाईनच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडाने 7 ते 9 जून 2022 दरम्यान आयोजित लंडन वाईन फेअरमध्ये 10 वाईन निर्यातदारांना सहभागी होण्याची सुविधा दिली. निर्यात केल्या जाणार्या उत्पादनांची गुणवत्ता प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी अपेडाने उत्पादनांच्या विस्तृत श्रेणी आणि निर्यातदारांना चाचणी सेवा प्रदान करण्यासाठी भारतातील 220 प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे.
(स्रोत - apeda.gov.in)