एटीएम न्यूज नेटवर्क ः बायर क्रॉप सायन्सेस लिमिटेड आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत येणाऱ्या सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (एनआरसीपी) यांच्यात सार्वजनिक-खाजगी भागीदारी बळकट करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन वेळापत्रक विकसित करणे आणि एनआरसीपी सोलापूर येथे मॉडेल डाळिंब बाग स्थापन करणे हे संशोधन सहकार्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आयसीएआर-एनआरसीपीचे संचालक डॉ. राजीव मराठे आणि बायर क्रॉप सायन्सेस लिमिटेड इंडियाचे फलोत्पादन पीक विभागाचे योगेश मोहिते यांनी आपापल्या संस्थांच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
आयसीएआर-एनआरसीपीने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या उत्पादन, संरक्षण आणि प्रक्रिया तंत्रज्ञानावर डॉ. मराठे यांनी या वेळी प्रकाश टाकला. डाळिंबासारख्या नगदी पिकांसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी बळकट करण्यासाठी आणि युरोपियन बाजारपेठेत निर्यात करण्यास इच्छुक असलेल्या डाळिंब शेतकऱ्यांना या भागीदारीचा वापर करण्यासाठी सामंजस्य कराराचे महत्त्व विशद केले.
सामंजस्य करारानुसार, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी आयसीएआर-एनआरसीपी बायरच्या सहकार्याने तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांसाठी मॉडेल बाग विकसित करणार आहे. तसेच युरोपियन संघासोबत संरक्षण वेळापत्रक तयार करण्यासह त्याचे मूल्यमापन करण्यासाठी एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन संरक्षण वेळापत्रक तयार करणार आहे.
एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाच्या वेळापत्रकाचे मूल्यांकन दोन हंगामात तिसऱ्या वर्षापासून एनआरसीपीच्या बागेत आणि चार शेतकऱ्यांच्या शेतात केले जाईल. या प्रकल्पात आवश्यकतेनुसार शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या क्षमता-निर्मिती उपक्रमांचाही समावेश आहे.