एटीएम न्यूज नेटवर्क : बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील प्रयोगशील शेतकरी मधुकर दादाजी मोरे यांना नवी दिल्ली येथे कृषीजागरण आणि आय.सी.ए.आर.तर्फे दिला जाणारा 'डिस्ट्रिक्ट मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया' या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री. मोरे हे मागील अनेक वर्षांपासून प्रयोगशील शेती करत आहेत. शेतीत नवनवीन गोष्टींचा अवलंब करत शेती फायद्याची कशी करता येईल यावर त्यांचा भर असतो. बायोमी टेक्नॉलॉजीज कंपनीच्या अॅग्री इनपुट ट्रेनिंगमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या या सगळ्या प्रवासात बायोमी टेक्नॉलॉजीज कंपनीचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि सीईओ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी मार्गदर्शन केले. देशभरातून अनेक शेतकऱ्यांनी या पुरस्कारासाठी नामांकन अर्ज दाखल केले होते. या कार्यक्रमासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शेतकरी पुसा कॅम्पसमध्ये उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मोरे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
शेतातील पिकांमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व नैसर्गिक शेती साठी प्रेरणादायी ठरत आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारासह संपूर्ण महाराष्ट्रात विना केमिकल नैसर्गिक शेतीचे यशस्वी प्रयोग सुरू असुन त्या साठी बायोमी चे प्रफुल्ल घाडगे यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभत आहे. सोमवारी (२ डिसेंबर) झालेल्या नवी दिल्ली येथील इंडियन अग्रीकल्चर रिसर्च (आय.सी.ए.आर) पुसा ग्राउंडवर शानदार कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी तथा कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी "कृषी जागरण आणि अॅग्रीकल्चर वर्ल्ड" चे संस्थापक एम.सी. डोमिनिक, मुख्य व्यवस्थापक संजय डोमिनिक, सहायक व्यवस्थापक राजश्री रॉय बुमन उपस्थित होते.
भारतातून एकूण २२ हजार शेतकऱ्यांनी या पुरस्कारारासाठी अर्ज केले होते. त्यातून श्री. मोरे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मोरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.