एटीएम न्यूज नेटवर्क ः यंदाच्या हंगामात राज्यात ऊस उत्पादन कमी झाल्यामुळे साखर उत्पादनाला फटका बसला आहे. उत्तर प्रदेशने चालू हंगामात साखर उत्पादनात महाराष्ट्राला मागे टाकले आहे. या आशयाचे वृत्त द इकोनॉमिक्स टाइम्सने पीटीआयच्या हवाल्याने दिले आहे.
हंगामादरम्यान महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या 210 कारखान्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशात 118 साखर कारखाने कार्यरत असतानाही उत्तर प्रदेशने ही कामगिरी केली आहे, असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे.
उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर कारखान्यांचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, "साखर उत्पादनासह इतर अनेक घटकांच्या बाबतीत उत्तर प्रदेश महाराष्ट्रापेक्षा पुढे आहे."
चौधरी पुढे म्हणाले, की "उत्तर प्रदेशने साखर हंगाम 2022-2023 मध्ये एकूण 107.29 लाख टन साखर उत्पादित केली आहे. (ज्यात 3.05 लाख टन खांडसरी (द्रव गुळापासून भौतिकरित्या काढलेली साखर) समाविष्ट आहे), तर महाराष्ट्राने 105.30 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्रातील १४.८७ लाख हेक्टरच्या तुलनेत उत्तर प्रदेशात ऊस लागवडीखालील क्षेत्र २८.५३ लाख हेक्टर (भारतातील कमाल) आहे."
दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पीटीआयला सांगितले की, "या वर्षी उसाचे उत्पादन कमी झाले, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखान्यांकडे उसाचे प्रमाण कमी पोहोचले. त्यामुळे ही तफावत आहे. मात्र, पुढील वर्षी (साखर कारखान्यांची) क्षमता वाढेल."
ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर ते जूनपर्यंत चालतो. "उत्तर प्रदेशात 2,348 लाख टन ऊस उत्पादन झाले आहे, तर महाराष्ट्रात ते 1,413 लाख टन झाले," असे चौधरी म्हणाले. ते पुढे म्हणाले, की 2022-2023 हंगामात उत्तर प्रदेशात साखर कारखान्यांनी गाळप केलेला एकूण ऊस 1,084.57 लाख टन होता, तर महाराष्ट्रात तो 1,053 लाख टन होता.
उत्तर प्रदेशात 19.84 लाख टन साखर इथेनॉलमध्ये वळवण्यात आली होती, तर महाराष्ट्रात ती 15.70 लाख टन होती. दोन्ही राज्यांमध्ये स्थापित साखर कारखान्यांच्या संख्येकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, महाराष्ट्रात 246 साखर कारखान्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशात 157 साखर कारखाने असून, उत्तर प्रदेशातील 118 च्या तुलनेत महाराष्ट्रात 210 साखर कारखाने कार्यरत आहेत, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की 2022-23 हंगामात शेतकऱ्यांना 28,494.32 कोटी रुपयांचे शुल्क अदा करण्यात आले आहे. जवळपास 80 साखर कारखानदारांनी उत्पादन झाल्यानंतर एका आठवड्यात 100 टक्के शुल्क अदा केले आहे.