एटीएम न्यूज नेटवर्क : कृषी उत्पादनापासून ते शेतमाल निर्यातीमध्ये नाशिकचा नावलौकिक आहे. विविध कृषी उत्पादने आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याला भारतभर लौकिक प्राप्त झाला आहे. कृषीमालाची गुणवत्ता आणि शेतकरी वर्गाला अद्यावत तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी १९९८ मध्ये सुरु झालेल्या कृषीथॉन प्रदर्शनाची सतरावी आवृत्ती यंदा २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ठक्कर डोम, एबीबी सर्कलजवळ, नाशिक येथे आयोजित करण्यात येत आहे. कृषीथॉन शेतकरी, कृषी उद्योजक, शास्रज्ञ आणि जाणकाराच्या विचारणाची देवाण-घेवाण करण्यासाठीचे अभिनव व्यासपीठ ठरले आहे अशी माहिती संजय न्याहारकर यांनी दिली
प्रदर्शनात शेतीची यंत्रे आणि उपकरणे, पीक संरक्षण आणि पोषण, अचूक कृषी तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती, कृषी रसायने आणि खते, बियाण्याच्या जाती आणि आनुवंशिकी, सिंचन आणि जल व्यवस्थापन प्रणाली, कृषी व्यवसाय आणि वित्त, व्हर्टिकल शेतीचे तंत्र, कृषी क्षेत्रातील ड्रोन ऍप्लिकेशन्स, मातीचे आरोग्य आणि संवर्धन, स्मार्ट सिंचन उपाय, एकात्मिक कीड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती पद्धती, कृषी व्यवसाय स्टार्ट-अप धोरणे, हवामानास अनुकूल पीक वाण असे विविध स्टॉल असणार आहेत सोबतच शासनाच्या विविध विभागाचा योजनांच्या जनजागृतीचा ह्यात समावेश असणार आहे.
पाच दिवस चालणाऱ्या कृषीथॉन प्रदर्शनामध्ये ३०० हुन अधिक कृषीपूरक संस्थांचा समावेश असणार तसेच पीकविषयक चर्चासत्रामध्ये नामांकित शास्रज्ञ मार्गदर्शन करतील, कृषीथॉन युवा सन्मानच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा सन्मान होणार आहे, कृषी रोजगार मेळावाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, यंदा भारत सरकारच्या लघु व सूक्ष्म मंत्रालयाद्वारे कृषीथॉनमध्ये सहभागी लघु उद्योजकांना स्टॉल भाड्यावर सबसिडी मिळणार आहे. लघुउद्योजकांना आपले उत्पादन प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती व संवादाची देवाणघेवाण साधण्यासाठी एक पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी www.krishithon.com या संकेतस्थळावर किंवा ९८२२८४२२६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन साहिल न्याहारकर ह्यांनी केले आहे.