एटीएम न्यूज नेटवर्क ः आंब्याच्या हंगामात कोकणातील हापूस आंबा खाल्ला नाही असे होत नाही. विशेषतः महाराष्ट्रातील आंबाप्रेमी नागरिकांना कोकणातील हापूस आंब्याची प्रचंड ओढ आहे. शिवाय देश-परदेशातही मोठी मागणी असते. हापूस आंबा हा कोकणातील आहे की नाही, हे ओळखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रत्नागिरी आणि देवगड येथील हापूस आंब्याला जीआय टॅग दिले आहे. त्याचे आता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहे.
राज्य सरकारच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, जीआय टॅग केलेल्या हापूस आंब्याला मागणी वाढत आहे. 2020 मध्ये कोकणाला जीआय टॅग चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे अनेक आंबा उत्पादक जीआय टॅग केलेले आंबे बाजारात पुरवत आहेत.
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकण विभागातून दररोज सरासरी 40,000 आंब्याच्या पेट्या येतात. अधिक खाजगी कंपन्या आणि आंबा उत्पादक शेतकरी जीआय टॅग केलेले आंबे थेट शेतातून ग्राहकांना विक्री करतात.
'कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर भागातील आंबे रत्नागिरी किंवा देवगड हापूस म्हणून पाठवले जातात. परंतु जीआय टॅगिंगमुळे ग्राहकांना कोकण विभागातील खरा हापूस आंबा मिळतो, असे वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
रायगड, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांना जीआय टॅग मिळाले आहे. यामुळे बाजार समितीमधील जीआय टॅग केलेले हापूस आंबे किरकोळ विक्रेते खरेदी करत आहेत. कारण त्यांच्या ग्राहकांना ते काय खरेदी करत आहेत याची खात्री दिली जाते, असे ते म्हणाले.
किसान कनेक्ट ही ऑनलाइन शेतमाल विक्री करणारी शेतकरी उत्पादक संस्था आहे. ही संस्था नवी मुंबई, मुंबई आणि पुण्यामध्ये जीआय टॅग केलेले हापूस आंबे थेट शेतातून ग्राहकांना पुरवत आहे. कारण नवी मुंबईतील त्यांच्या खरेदी आणि प्रक्रिया युनिटला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे.
किसान कनेक्ट सेफ फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवसाय प्रमुख आणि संचालक निधी निर्मल सांगतात, बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे आंबे दाखल होत असतात. आंब्यांचे उत्पादन झालेले मूळ ठिकाण त्याच्या सत्यतेबद्दल माहिती मिळू शकत नाही. परंतु जीआय टॅगमुळे हापूस आंब्याच्या मूळ ठिकाणासह त्याची सत्यता जाणून घेण्यास मदत मिळते.
त्या म्हणाल्या, की कंपनीने एक जीआय टॅग विकसित केला आहे. यामधध्ये ग्राहकाला आंब्याचे मूळ ठिकाण, बागांचे अचूक स्थान आणि इतर तपशीलांची माहिती मिळते. आम्ही या हंगामात जीआय टॅगिंगसह सुमारे 75,000 आंब्याच्या पेट्या विकण्याची अपेक्षा करत आहोत.
रत्नागिरीतील शेतकरी प्रकाश चौगुले म्हणाले की, देशाच्या इतर भागांतून आणि अगदी दक्षिण आफ्रिकेतील अनेक आंब्याचे वाण हापूस आंबे म्हणून ग्राहकांना स्वस्त दरात विकले जात आहेत. याचा आमच्या व्यवसायावर परिणाम होतो.
जीआय टॅगिंगद्वारे ग्राहकांना योग्य ठिकाणावरून आलेल्या अस्सल हापूस आंब्याची उच्च दर्जाची चव मिळते. सर्व हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी जीआय टॅगिंगसाठी नोंदणी केली असे नाही, परंतु प्रत्येकाला त्याचा लाभ घ्यायचा आहे म्हणून संख्या वाढत आहे.
(स्रोत ः अपेडा)