एटीएम न्यूज नेटवर्क: जगात सर्वाधिक फळे उत्पादन करणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. जगातील १८ देशांनाही भारत अन्नधान्याची निर्यात करतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतीला अनुकूल धोरणामुळे भारत फलोत्पादनात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, असे गौरोवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.
कोल्हापूर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी येथे द्राक्ष शेतीची पाहणी केल्यानंतर निर्यातीसाठीच्या द्राक्षाच्या पहिल्या कंटेनेरचे पूजन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, खजिनदार सुनील पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमान कोकाटे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना सुरू केली होती. यामध्ये सुधारणा करून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरू केले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वाधिक फळबागांची लागवड करण्यात आली. मी अनेकदा परदेशात गेल्यावर तिथे महाराष्ट्रातील फळे पाहायला मिळतात. भारत आखाती तसेच युरोपिय देशांना फळांची निर्यात करत आहे. हा बदल शेतकऱ्यांच्या कष्टामुळे झाला आहे. आज देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन होते. परदेशातही द्राक्षाची निर्यात होत असल्याचे पवार म्हणाले.
श्री. पवार म्हणाले की, सध्या देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन होत आहे. भारत साखरेच्या उत्पादनात जगात एक क्रमांकाचा देश आहे. ब्राझीलमधील लहान शेतकऱ्यांचा ऊस 50 हजार टन असतो. ब्राझीलमध्ये सहा ते सात ऊस उत्पादक शेतकरी एकत्र येऊन कारखाना चालवतात. आपल्या इथे काही हजारात सभासद असतात.