एटीएम न्यूज नेटवर्क ः गेल्या काही वर्षांत कृषी आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये कृषी आणि संबंधित उत्पादनांची निर्यात 2,52,400 कोटी रुपयांची होती. तीच 2020-21 मध्ये 3,10,130 कोटी रुपयांपर्यंत वाढून 22.87 टक्क्यांवर गेली, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत दिली.
कृषी आणि संबंधित उत्पादनांची निर्यात गेल्या एका वर्षात म्हणजे 2021-22 या कालावधीत 3,74,611 कोटी रुपयांच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. त्यात 20.79 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तोमर म्हणाले की, पश्चिम विभागात गुजरात आणि महाराष्ट्राने कृषी आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीत आघाडी घेतली. त्यानंतर पूर्वेकडील आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल, उत्तर विभागात उत्तर प्रदेश आणि हरियाणा, तर दक्षिणेकडील प्रदेशात कर्नाटक आणि केरळ आघाडीवर आहेत.
2021-22 च्या आर्थिक वर्षात निर्यात केलेल्या वस्तूंपैकी सागरी उत्पादनांचे मूल्य 13,734.61 कोटी रुपयांनी वाढले. साखरेचे मूल्य 13,676.12 कोटी रुपयांनी वाढले. गव्हाच्या मूल्यात 11,672.37 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर बासमतीचा अपवाद वगळता तांदूळ 10,168.39 कोटी रुपयांनी वाढला आहे, असे श्री. तोमर यांनी सांगितले.
कच्च्या कापसाच्या निर्यातीत कचऱ्याचा समावेश असून, 7,038.66 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर इतर तृणधान्यांचे मूल्य 2021-22 मध्ये 2911.04 रुपयांनी वाढले आहे. दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीत 2,352.93 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर कॉफीचे मूल्य 2,273.97 कोटी रुपयांनी वाढले आहे. एरंडेल तेलाच्या निर्यातीत 1,952.36 कोटी रुपयांची वाढ झाली असून, विविध प्रक्रिया केलेल्या वस्तूंचे मूल्य 2,311.86 कोटी रुपयांनी वाढले आहे.