एटीएम न्यूज नेटवर्क ः देशात पशुधनाच्या मोठ्या संख्येने देशी जाती असून, त्या सर्व राज्यात ओळखल्या जाणे आवश्यक आहे. यामुळे कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्र समृद्ध होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद(आयसीएआर)ने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित केलेल्या पशु जाती नोंदणी प्रमाणपत्रांच्या वितरण समारंभात ते बोलत होते.
श्री तोमर म्हणाले, की देशातील जवळपास निम्मे पशुधन अजूनही अवर्गीकृत आहे. अशा अनोख्या जाती लवकरात लवकर ओळखल्या जाव्यात, जेणेकरून या अवर्गीकृत जाती वाचवता येतील. आयसीएआर या दिशेने काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशात अशा जाती ओळखण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ते म्हणाले, की राज्य विद्यापीठे, पशुसंवर्धन विभाग, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या सहकार्याशिवाय ते पूर्ण केले जाऊ शकत नाही. आयसीएआरने या सर्व संस्थांच्या सहकार्याने मोहीम म्हणून देशातील सर्व प्राणी जनुकीय संसाधनांचे दस्तऐवजीकरण सुरू केले आहे. हा मोठा गट देशातील स्वदेशी प्राण्यांच्या अनुवांशिक संसाधनांचे दस्तऐवजीकरण करण्याचे ध्येय पूर्ण करेल.
देशाच्या विविध भागांतील नवीन जातींच्या सर्व अर्जदारांचे कौतुक करताना श्री तोमर म्हणाले, की या देशी जाती अद्वितीय आहेत. यामुळे सर्व राज्यांमध्ये विविधतेची विशालता दिसून येते. मानवी संस्कृतीच्या विकासाच्या काळापासून पशुपालन हा ऐतिहासिकदृष्ट्या शेतीचा अविभाज्य भाग आहे. आपला देश प्राणी जैवविविधतेने समृद्ध आहे. या प्रजातींचा वापर अन्न, वाहतूक, खत, कृषी उद्देश इत्यादी विविध कारणांसाठी केला जात आहे.
पूर्वी आपल्या शेतकऱ्यांनी त्या त्या हवामानाच्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या प्रजातींच्या अनेक विशिष्ट जाती विकसित केल्या आहेत. पशुधन आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील भारताच्या भव्य विविधतेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष आहे. देशातील प्राण्यांच्या अनुवांशिक संसाधनांचे दस्तऐवजीकरण आणि त्यांच्या अनुवांशिक विविधतेचे जतन करण्याच्या प्रयत्नांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्न आणि कृषी संघटने (एफएओ)ने कौतुक केले आहे.
या वेळी नवीन नोंदणी झालेल्या 28 जातींच्या जात नोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये 10 गुरे, 5 डुक्कर, 4 म्हशी, शेळी व कुत्रा प्रत्येकी 3, मेंढी, गाढव व बदक यांच्या प्रत्येकी एक जातीचा समावेश आहे. या देशी जातींवर सार्वभौमत्वाचा दावा करण्यासाठी डीएआरईने 2019 पासून राजपत्रात सर्व नोंदणीकृत जाती अधिसूचित करण्यास सुरुवात केली आहे. कार्यक्रमात डीएएचडी, आयसीएआर, त्यांच्या संस्थांचे अधिकारी आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.