एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत बेंगळुरू येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी फलोत्पादनावरील चार दिवसीय राष्ट्रीय फलोत्पादन मेळ्याचे उद्घाटन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना श्री तोमर म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात आणि आवश्यक पोषण सुरक्षा प्रदान करण्यात फलोत्पादन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, हे एक प्रस्थापित सत्य आहे. फलोत्पादन पिकांच्या उत्पादनात आणि उपलब्धतेत झपाट्याने वाढ झाल्याने देशाच्या पोषण सुरक्षेतील अंतर भरून काढण्यास मदत होईल.
श्री. तोमर म्हणाले की, सन 1950-51 मध्ये फलोत्पादन 25 दशलक्ष टनांवरून 13 पटीने वाढून 2020-21 मध्ये 331 दशलक्ष टन झाले आहे. जे अन्नधान्य उत्पादनापेक्षा अधिक आहे. 18% क्षेत्रफळ असलेले क्षेत्र कृषी जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एकूण मूल्याच्या सुमारे 33% योगदान देते. हे क्षेत्र आर्थिक वाढीचे चालक म्हणून मानले जात आहे.
50 हजार कोटींहून अधिक किमतीच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये फलोत्पादनाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेतीला तंत्रज्ञानाशी जोडून कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दीर्घकाळापर्यंत व्यापक लाभ मिळू शकतील.
ते म्हणाले की, अर्थसंकल्पात फलोत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी, विशेषतः आत्मनिर्भर (स्वयंपूर्ण) स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी 2,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीसह, उच्च मूल्याच्या बागायती पिकांसाठी रोगमुक्त, दर्जेदार लागवड साहित्याच्या उपलब्धतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत.
यासोबतच समुह विकास कार्यक्रमाद्वारे फलोत्पादन क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. नैसर्गिक शेतीला जनचळवळ बनवण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी 459 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 3 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आर्थिक मदत दिली जाईल, ज्यासाठी 10,000 बायो कृषिनिविष्ठा संशोधन केंद्रांची स्थापना केली जाईल.
शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. एफपीओ हे लघु आणि मध्यम शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे, ज्याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळू लागला आहे. बागायती एफपीओही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत.