एटीएम न्यूज नेटवर्क ः खत व्यापाऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यासाठी ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय खते आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन चर्चा केली. खत व्यापाऱ्यांच्या समस्या लवकर सोडवू असे आश्वासन मांडविया यांनी दिले. या वेळी ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, सचिव अरविंदभाई पटेल आणि जामनगरचे भरतभाई पटेल उपस्थित होते.
खत व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या असलेल्या खतांवरील डिलर मार्जिन 6 वरून 8 टक्क्यांपर्यंत वाढवावे, नमुना नापास झाल्यास व्यापाऱ्यांना सवलत द्यावी, प्रमुख 20 ची यादी तत्काळ बंद करावी, एमएफएमएस पुन्हा 50 रुपये प्रति टन दराने सादर करावे, उत्पादक कंपन्यांना सक्तीचे टॅगिंग तत्काळ बंद करावे, आवश्यक वस्तू कायद्यातून खत नियंत्रण आदेश वगळावा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
मंत्री मनसुख मांडविया यांनी फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक अरुण चौधरी यांना फोन करून ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाला भेटून शक्य तितक्या लवकर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. एप्रिलमध्ये एफएआयच्या महासंचालकांसोबत या विषयावर शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर हे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.