भारत कृषीप्रधान देश आहे. देशातील ८० टक्के जनता शेती व शेतीशी निगडित व्यवसाय करतात. सततची दुष्काळी परस्थिती, अवकाळी पाऊस, हवामानात होणारे बदल, यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. या दुष्टचक्रातून शेतकरी वाचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळायला हवी. शेतीचा विकास व्हायचा असेल तर त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्यांना असणे गरजेचे आहे. अशा वेळी कृषी प्रदर्शनाची गरज अधोरेखित होते.
भारतीय शेतकरी हा पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होता. परंतु माहिती व तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यानंतर उत्पादन वाढीसाठी शेतकरीसुद्धा कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान अवगत करीत आहेत. शेती क्षेत्रात असंतुलन आहे, ते संतुलित करण्यासाठी पिकांचे वैविध्यीकरण, तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करू शकतो. शेतकर्यांना एकाच वेळी आणि एकाच जागी कृषी क्षेत्रातील आणि त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने अनेक पातळीवर कृषी प्रदर्शने भरविली जातात.
परंतु कृषीप्रदर्शनाची आवश्यकता काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो. पूर्वी कृषी क्षेत्रातील नवीन माहिती मिळावी यासाठी परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित केली जात होती. कालांतराने कृषी प्रदर्शनाची सुरुवात झाली. यासाठी काही खासगी संस्थांनी पुढाकार घेऊन शासनाच्या मदतीने कृषी प्रदर्शनाला मूर्त रूप दिले. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला, परंतु नंतर प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि पाहता पाहता कृषी प्रदर्शनाची व्याप्ती वाढत गेली. ग्रामीण भागात प्रसिद्धी व प्रचार यंत्रणा राबवल्याने मोठ्या प्रमाणात कृषीप्रदर्शनाचा प्रसार झाला.
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना/उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय इत्यादींचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे. कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी/उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट घडावी व सामान्य शेतकऱ्यांना शंका निरसन करून घेता यावे, या उद्देशाने कृषी प्रदर्शने भरविले जातात.
जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात होणारे बदल आणि त्याचे बरे-वाईट परिणाम कृषीप्रदर्शनाच्या माध्यमातून जाणून घेण्याची संधी मिळते. प्रदर्शनामध्ये चर्चासत्रे, परिसंवाद घेतले जातात. विविध पिकांवरील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ येथे आपले विचार आणि अनुभव मांडतात. चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होते. वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा माहिती होतात. पिकांच्या नवीन जाती, नवी अवजारे, नवे तंत्रज्ञान माहिती होते. कृषीप्रदर्शन ज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू ठरल्याने शेतकरी आवर्जून अशा कृषीप्रदर्शनाला भेट देतात.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. शेतीत आधुनिक यंत्राचा वापर करण्याकडे शेतकरी कुटुंबाचा कल वाढला आहे. यातून ट्रॅक्टर, पेरणीयंत्र, रोटाव्हेटर, पंजी, बीबीएफ यंत्र, दोनफाळी नांगर आणि इतर यंत्र यांच्या माध्यमातून शेती केली जात आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्राच्या सहाय्याने शेती केली जात आहे. हे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीप्रदर्शनाशिवाय कोणतेच ठिकाण नाही. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांचे स्टॉल्स लावून नवीन संशोधनाची माहिती शेतकऱ्यांना देत असतात. या साठी कृषी प्रदर्शने योग्य व्यासपीठ ठरत आहेत.
कृषी प्रदर्शनाला शासनाकडूनही आर्थिक तसेच नैतिक पाठिंबा मिळत असतो. कृषी विभागाकडूनही प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यालाही प्रतिसाद मिळत आहे. तंत्रज्ञानातून कृषीविकास व कृषीविकासातून देशाचा विकास ही संकल्पना घेऊन कृषीप्रदर्शन ठिकठिकाणी आयोजित होत आहेत. शेती व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी कृषीप्रदर्शनाची नितांत गरज आहे.