एटीएम न्यूज नेटवर्क : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ सादर केला. अर्थसंकल्प २०२४ सादर करताना, अर्थमंत्र्यांनी सांगितले की कृषी व संलग्न क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल.
शेती उत्पादकता वाढवण्यासाठी व हवामानास अनुकूल नव्या जाती विकसित केल्या जातील. एकूण ३२ पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या आणि हवामान बदलाला अनुकूल अशा नवीन १०९ जाती विकसित केल्या जातील अशी घोषणा त्यांनी केली.
पुढील दोन वर्षात १ कोटी शेतकऱ्यांना प्रमाणीकरण आणि ब्रँडिंगद्वारे समर्थित नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली जाईल. संशोधन संस्था व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाईल. १० हजार जैवनिविष्ठा संसाधन केंद्रे उभारली जातील असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांनी कडधान्य व तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्पादन, साठवणूक आणि विपणन या बाजू बळकट केल्या जातील, भाजीपाला पिकांसाठी क्लस्टर विकसित केले जाणार आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि स्टार्ट अप यांना भाजीपाला पिकांच्या पुरवठा साखळ्या उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यात भाजीपाला संकलन, साठवणूक आणि मार्केटिंग यांचा समावेश असेल.
या व्यतिरिक्त अर्थमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या सहकार्याने कृषीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देईल. देशातील ४०० जिल्ह्यामध्ये खरीप पिकांचे डिजिटल पीक सर्वेक्षण केले जाईल.
सहा कोटी शेतकरी आणि त्यांच्या जमिनीचे तपशील शेतकरी व जमीन रजिस्टरमध्ये नोंदवले जातील. पाच राज्यांमध्ये जन समर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड वितरित केले जातील असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. नाबार्डच्या माध्यमातून कोळंबी शेती आणि निर्यातीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.