महाराष्ट्रातील शेतीच्या क्षेत्रातील आदर्श व अग्रगण्य महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाची स्थापना २३ डिसेंबर १९६० रोजी हाताच्या बोटावर मोजण्याइतके तत्कालीन द्राक्ष उत्पादक कवी मोरोपंताच्या बारामती या पावन नगरीत एकत्र जमा झाले व त्यांनी एका छोट्याशा रोपट्याच्या माध्यमातून संघाची मुहुर्तमेढ रोवली. मागील ६१ वर्ष संघाने विकास व संशोधनाची कास धरून सामाजिक बांधिलकी धरत द्राक्ष शेतीच्या विविध क्षेत्रासाठी व्यासपीठ निर्माण करून निरपेक्ष योगदान दिले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मातृवृक्ष या श्रध्देने व निष्ठेने, विश्वासाने उभारी देऊन संघाने शेतकऱ्यांचे मनोबल द्विगुणित केले आहे.
द्राक्ष उत्पादकांसाठी मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्याचे कार्य संघ करत असून, अनेक ज्येष्ठ संस्थापक आणि संचालकांच्या दूरदर्शीपणामुळे आणि मार्गदर्शनामुळे आज यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे. महाराष्ट्रात आजमितीस ४.५ लाख एकरावर द्राक्ष लागवड झाली असून, दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. नोव्हेंबर २०२२ अखेर ३२,५०० च्या वर संघाचे सभासद आहेत. सध्या फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर असून, द्राक्ष पिकाच्या उन्नतीसाठी संघाने केलेल्या कार्यामुळेच हे शक्य झाले आहे.
द्राक्ष व्यवसायाला विज्ञान व संशोधनाचे बळ संघाच्या व्यापीठावरून मिळाले व शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा राजमार्गच सापडला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्यांना यश येऊन द्राक्ष उत्पादक उत्कृष्ट दर्जाचे वाण, रंग, आकार याद्वारे देशभरातच नव्हे, तर आखाती देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सर्वात चोखंदळ असलेल्या युरोपीयन बाजारपेठेतही महाराष्ट्रातील द्राक्षाने ग्राहकांना भुरळ घातली आहे. नाशिक, सांगली, सोलापुर, पुणे, अहमदनगर, जालना, लातूर, सातारा, उस्मानाबाद व बीड जिल्हयातील हवामान द्राक्ष पिकांसाठी अनुकूल असल्याने उच्चतम गुणवत्तेचे द्राक्ष उत्पादन होत आहे. कोविडच्या काळातही भारतीय द्राक्षाच्या मागणीचे सातत्य राहिले असून निर्यात घटली नाही. जगाच्या द्राक्ष उत्पादन क्षमतेचे उच्चांक महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांनी कधीचा गाठलेला आहे.
बेदाणा उत्पादनातही भारत वरच्या क्रमांकावर असून, बेदाण्याच्या क्षेत्रातही द्राक्ष बागाईतदारांनी मोठी आघाडी घेऊन आकर्षक स्वरूपाचा बेदाणा उत्पादीत केला आहे. पिवळा, हिरवा बेदाणा, विविध आकार व चवीनुसार टिकाऊ मनुके महाराष्ट्रात तयार केले जातात. द्राक्ष ही वेलवर्णीय वनस्पती असून, मधुर रसाची काळ्या, पिवळ्या, गुलाबी रंगाच्या द्राक्षांनी ग्राहकांना आकर्षित केले आहे. द्राक्ष खाण्यासाठी, जेली, ज्युस, वाईन व मनुका तयार करण्यासाठी मोठया प्रमाणावर वापरतात.
अनेक प्राचीन वास्तूंमध्ये दगडावर कोरलेल्या द्राक्षांच्या वेली देशातील पुरातन काळातील द्राक्ष उत्पादनांचे दाखले देतात. ज्ञानेश्वरीमध्ये द्राक्षाचा उल्लेख असून, भारतीय द्राक्षाचे अनेक ऐतिहासिक पुरावे सापडतात
नाशिक जिल्ह्यात निर्यातीच्या द्राक्षाचे मोठे उत्पादन होत आहे. सोलापूर, सांगली, पुणे विभागातही निर्यातीबरोबरच विविध रंगाची व विविध आकारमानाची टिकाऊ द्राक्षे मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात. सोलापूर परिसरात काळ्या द्राक्षाच्या विविध जातींची निर्मिती झाली आहे. तर तासगाव सांगली परिसरातील उत्पादकांनी बेदाणा निर्मिती बरोबरच लांब व विविध आकाराचे अनेक द्राक्ष वाण महाराष्ट्राला दिले आहेत.
द्राक्ष व्यवसायाने ग्रामीण भागात मजुरीच्या माध्यमाने गरीब कुंटुंबातील बेरोजगारांना फार मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या व्यवसायावर अनेक भागातले अर्थकारण आजही विसंबून आहे. खते, औषधे, संजीवके, बॉक्स पॅकिंग, क्रेटस् व वाहतूक व्यवस्था याचा मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेतीत वापर होत असल्याने अनेक व्यावसायिक व उद्योजक हे मोठ्या प्रमाणावर या व्यवसायाशी आर्थिकरित्या जोडले गेले आहेत.
द्राक्षामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून, पौष्टिक द्राक्षे आरोग्यदायी आहेत. आहारामध्ये द्राक्षामधून क व ई जीवनसत्व सहजरित्या उपलब्ध होते. पक्व झालेल्या द्राक्षाच्या काढणीपूर्वी ३० ते ४० दिवस कोणतीही औषध फवारणी केली जात नसल्याने द्राक्षावर कोणत्याही औषधांचे दुष्परिणाम राहात नाहीत.
भारतातील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्थेसह अनेक नामवंत विद्यापीठे व शासकीय संस्थेतील शास्त्रज्ञांचे चर्चासत्र, परिसंवादाच्या माध्यमांतून मार्गदर्शन केले जाते. नाशिक व पुणे येथे संघाच्या २ प्रयोगशाळा असून, त्याद्वारे माती, पाणी, देठ, खते परीक्षण करून शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन केले जाते. संघाच्या सभासदांना नाममात्र ही सुविधा पुरवली जाते.
पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली याठिकाणी संघाची स्वतंत्र विभागीय अद्ययावत कार्यालये असून २६ वितरण केंद्रे आहेत. याद्वारे सभासदांना ना नफा ना तोटा याधर्तीवर खते, औषधे इ. अत्यावश्यक निविष्ठा आयात करून पुरविल्या जातात.
संघाच्या या आदर्श कामकाजाचा अभ्यास करून शोधनिबंधाद्वारे प्रा. निर्मला विखे वाबळे, अहमदनगर यांनी डॉक्टरेट (PHD) मिळविली आहे.
महाराष्ट्रातील कष्टाळू व धाडसी शेतकऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन अनेकदा नैसर्गिक आपत्तींचा सामना करून द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेवले आहे. संघाचे सभासद, आजी माजी संचालक, कर्मचारी वर्ग यांनी दिलेली साथ संस्थेसाठी लाख मोलाची आहे. महाराष्ट्राच्या शेतीच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने शेतकऱ्यांची एकत्र मोट बांधून सांघिक प्रयत्नाद्वारे समृध्दीचा राजमार्गच तयार केला आहे.
संघाच्या वर्धापन दिनाच्या तमाम सभासद, शेतकरी बंधू, संस्थेचे कर्मचारी वर्ग व द्राक्ष व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या व्यापारी, मजूर, उद्योजक सर्वांनाच वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !