वडोदरा: आयपीएल बायोलॉजिकल्स लिमिटेडने गुजरातच्या वडोदरा येथे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आपला तिसरा जैविक उत्पादन प्रकल्प सुरू केला असून, त्यामुळे कंपनीची एकूण उत्पादन क्षमता प्रति वर्ष ७,००० किलोलिटर झाली आहे. यामुळे तीन दशकांच्या सूक्ष्मजैविक नवोपक्रमाचा विस्तार होऊन शेतकऱ्यांना जैविक उपाययोजना पुरवता येतील. आयपीएल बायोलॉजिकल्सचे सीएमडी, महेश भगचंदका म्हणाले की, देशांतर्गत जैविक उत्पादन वाढवणे आणि त्याला लक्ष्यित सरकारी प्रोत्साहनांची जोड दिल्यास भारतावरील खत अनुदानाचा भार कमी होऊ शकतो. रासायनिक आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते आणि परकीय चलन साठा सुधारू शकतो.
ही नवीन सुविधा मध्य आणि दक्षिण भारतातील, तसेच निर्यात बाजारपेठेतील मागणी पूर्ण करेल. कंपनी आपला जागतिक विस्तार करत असून १५ देशांमध्ये आपल्या उत्पादनांची नोंदणी करत आहे.
१२ एकर परिसरामध्ये पसरलेल्या आणि सुमारे २ लाख स्क्वेअर फूट बांधकाम असलेल्या या पूर्णपणे स्वयंचलित प्लांटमुळे कंपनीची एकूण उत्पादन क्षमता आता दैनंदिन ७००० किलोलीटरवर पोहोचली असून, यामुळे देशांतर्गत कृषी-जैविक परिसंस्थेला मोठी ताकद मिळणार आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय काम करणारी ही प्रगत यंत्रणा असून यामुळे कामाची कार्यक्षमता कमालीची वाढणार आहे.
पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना असलेल्या या प्लांटमध्ये सांडपाण्याचा १००% पुनर्वापर करणारी ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ (ZLD) यंत्रणा आणि ५०० किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा संपूर्ण प्लांट ‘स्काडा’ (SCADA) प्रणालीद्वारे नियंत्रित केला जातो, ज्यामुळे उत्पादनावर रिअल टाइम अचूक लक्ष ठेवता येते. या केंद्रातून प्रगत जैवखते, जैविक कीटकनाशके आणि पिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी उत्पादने तयार केली जातील, ज्यामुळे जमिनीची सुपीकता नैसर्गिकरीत्या टिकून राहील. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे रासायनिक खतांची आयात कमी होऊन देशाचे परकीय चलन वाचणार आहे आणि सरकारवर असणारा खत अनुदानाचा आर्थिक बोजा लक्षणीयरीत्या कमी होईल. तर दुसरीकडे पिकांवरील विषारी रसायनांचा अंश कमी होऊन नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित अन्न मिळणार आहे.
Source - Chemical Industry Digest